लखनऊ, 29 मार्च : लोकसभेच्या प्रचारसभांना आता सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेते मोठ्या सभा घेत आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. आयोध्येतील राम मंदीराची बाजू लढणारे हिंदु पक्षकार महंत धर्मदास यांनी म्हटलं की, आजपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले नाही. राम मंदिराच्या उभारणीसाठी काँग्रेस गंभीर नाही. प्रियांका गांधी भेटल्याच तर त्यांना आशीर्वाद देईन असं त्यांनी म्हटलं आहे.
आयोध्येतील राम मंदिर आतापर्यंत न होण्यामागे काँग्रेसचा हात आहे. गांधी कुटुंबातील अनेकांनी आतापर्यंत हनुमानगढीला भेट दिली आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही रामललाचे दर्शन घेतले नाही असं धर्मदास यांंनी म्हटलं आहे.
प्रियांका गांधी आयोध्येत आहेत. जर त्यांनी हनुमान गढीचे दर्शन घेतलं तर त्यांना आशीर्वाद मिळेल. प्रियांका गांधींकडे सरकार आल्यास राम मंदिर उभारण्याची मागणी करणार असल्याचे महंत ज्ञान दास म्हणाले.
आयोध्येतील हनुमानगढीतील पुजारी राजू दास यांनी म्हटलं आहे की, हिम्मत असेल तर प्रियांका गांधी यांनी रामललाचे दर्शन घ्यावे. तरच त्या हिंदुत्ववादी असल्याचे मान्य करेन असं राजू दास यांनी म्हटलं आहे.
राजू दास म्हणाले की, प्रियांका गांधींच्या पूर्वजांनी कधीही रामाचं अस्तित्व मानलं नाही. पण उशिरा का होईना शहाणं होऊन त्यांनी हनुमान आणि रामाचे दर्शन घ्यावं. हनुमानगढीचं दर्शन घेणं हा त्यांच्या राजकीय स्टंटबाजीचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
प्रियांका गांधी यांनी आयोध्या, प्रयागराज, वाराणसी दौऱ्यात अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील प्रचार जोराने करत आहेत. याआधी प्रियांका वाराणसीतील काशिविश्वनाथ मंदिरात गेल्या होते. तसेच त्यांनी गंगा आरतीही केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, Congress, Election 2019, Lok sabha 2019, Priyanka gandhi, Ram Mandir, Uttar pradesh