रामपूर, 04 फेब्रुवारी : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये (Tractor rally) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्काराला जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्या ताफ्याला अपघात झाला. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. सुदैवाने या अपघात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते, त्यातच कारची काच धुरकट झाली होती.
त्यामुळे समोर काही दिसत नसल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या कार एकमेकांवर जाऊन आदळल्यात. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना काहीच कळाले नाही, त्यामुळे एकापाठोपाठ गाड्या एकमेकांवर आदळल्यात. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे.
नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान रामपूरमधील नवरीत सिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. नवरीत सिंग हा वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना त्याचा अपघात झाला होता. या अपघातात नवरीत सिंग मृत्युमुखी पडला होता. नवरीत सिंगच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी जात आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित राहण्याची असल्याची शक्यता आहे. सोबतच राष्ट्रीय लोक दल चे नेते जयंत चौधरी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Priyanka gandhi