नवी दिल्ली, 19 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशात गंगायात्रा काढली आहे.प्रियांका गांधींनी या यात्रेत भाजपवर प्रतिहल्ला चढवला. काँग्रेसने 70 वर्षं काय केलं हा आरोप भाजप किती वर्षं करणार, असा सूर लावत, भाजपच्या या आरोपाला एक्स्पायरी डेट आहे, असं त्या म्हणाल्या.
काँग्रेसने 70 वर्षं काय केलं याहीपेक्षा भाजपने गेल्या 5 वर्षांत काय केलं याचं उत्तर लोकांना हवं आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं.भंडोहीमध्ये ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियांका गांधींनी सरकारवर हा आरोप केला.
'गांधी बहीणभाऊ हे पिकनिकला निघाले आहेत',असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केलं होतं. यावर उत्तर देताना, मी गेल्या 3 ते 4 वर्षांत इटलीला गेले नाहीये. माझ्या आजीला भेटायला मी गेलं पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचारमोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणन त्यांनी 3 दिवसांची गंगायात्रा काढली आहे. या यात्रेचा समारोप त्या वाराणसीमध्ये करणार आहेत. या यात्रेदरम्यान प्रियांका स्थानिक लोकांच्या भेटी घेतायत. त्यासोबत त्यांनी मंदिरांना भेटी देण्याचा कार्यक्रमही आखला आहे. त्यांनी सीतामढी मंदिराला भेट देऊन पूजाअर्जाही केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जमिनीवर येऊन राज्यात काय स्थिती आहे ते पाहावं असं त्या म्हणाल्या. लोक चिंतित आहेत कारण त्यांना काहीही मिळालेलं नाही, असाही आरोप त्यांनी केला.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 11 एप्रिलला ते सुरू होईल आणि 19 मे ला संपेल. त्यामुळेच प्रियांका गांधींवर काँग्रेसच्या प्रचाराची मोठी जबाबदारी आहे.
=============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.