नवी दिल्ली, 11 जानेवारी : शिवसेनेसोबतचा तणाव कमी व्हावा यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आणि समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर यावेत असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर मांडला असल्याचीही माहिती आहे. भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या प्रयत्नांनंतर शिवसेना नेमका काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
भाजपचं महाअधिवेशन
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपचं महाअधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेते या अधिवेशनाला हजर राहणार आहे.
सेना-भाजप युतीबाबतचा चर्चा होण्याची शक्यता
शिवसेना आणि भाजपच्या युतीवर आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी भाजपच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिले होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा फाॅर्म्युला ठरला आहे, फक्त घोषणा बाकी आहे, असा खुलासा केला होता. त्यामुळे, आज दिल्लीत यावर निर्णय निघतो का हे पाहण्याचं ठरणार आहे.
'मित्रों...' भुजबळांकडून मोदींच्या मिमिक्रीनंतर तुफान हशा, VIDEO व्हायरल