लखनऊ, 27 जानेवारी : प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी पालकांकडून अनेकदा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मुलांना खासगी शाळेत दाखल केलं जातं. पण हळू हळू सरकारी शाळांमधलं चित्र आता बदलताना दिसतंय. प्राथमिक शाळेत असलेल्या सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा आता खासगी शाळांपेक्षा कमी नाही. मुलांना शिस्त लावण्यापासून ते त्यांच्या खाण्या-पिण्यासाठीची व्यवस्थासुद्धा चांगली दिली जाते. उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या सरकारी प्राथमिक शाळेचं सध्या कौतुक होतंय. तिथे असणारं शिक्षण आणि व्यवस्था ही खासगी शाळांनाही मागे टाकेल अशी आहे.
मुरादाबादच्या फरीदपूर हमीर इथल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना यांनी २०१६ मध्ये या शाळेची जबाबदारी घेतली. आपल्या शाळेला पुढे न्यायाचा चंग त्यांनी बांधला. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी परिसरात स्वच्छता, खाणं-पिणं आणि शिक्षण इत्यादीवर लक्ष केंद्रीत केलं. आता या सर्व बाबींमध्ये शाळेची गुणवत्ता अव्वल अशी आहे. स्थानिकांनी त्यांची मुले खासगी शाळेतून पुन्हा सरकारी प्राथमिक शाळेत दाखल केलीत.
हेही वाचा : शिक्षकाला विद्यार्थ्यांनी घडवली अद्दल; रात्री तरुणीला आणलेलं खोलीत अन् सकाळी झाली भंडाफोड
अर्चना सिंह यांनी शाळेचा कायापालट इतका केला की त्यानिमित्त सत्कार समारंभासाठी त्यांना बोलावलं जातं. मात्र माझ्यासाठी माझं समाधान हाच मोठा पुरस्कार असल्याचं त्या म्हणतात. दर महिन्याला आपल्या वेतनातील ठराविक रक्कम त्या शाळेसाठी काढून ठेवतात. ही रक्कम शाळेच्या विकासासाठी अनेक योजानांमध्ये वापरता येते. तसंच मुलांचा वाढदिवस साजरा करणं किंवा सण समारंभ त्यांच्यासोबत साजरे केले जातात.
सध्या प्राथमिक शाळेत २६० मुलं शिकतात. शिक्षकसुद्धा प्रामाणिकपणे मेहनत करतात आणि त्यामुळेच शाळेची उपस्थिती १०० टक्के असते असं अर्चना यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रमही असतो. जो विद्यार्थी नियमित वर्गात येतो आणि अभ्यास पूर्ण करतो अशांची स्टार ऑफ द मंथ म्हणून निवड केली जाते. अर्चना म्हणतात की मुलांनी शाळेचं नाव मोठं करावं आणि आयुष्यात यशस्वी व्हावं हीच माझी इच्छा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttar pradesh