'जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन',प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

'जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन',प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

  • Share this:

पणजी, 19 मार्च : गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री उशिरा 1 वाजून 48 मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तसंच यावेळेस मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडी घडल्या आणि अखेर मध्यरात्री 1.48 वाजण्याच्या सुमारास प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 11 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (17 मार्च)निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या जागेवर प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. अखेर अनेक बैठका झाल्यानंतर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 2005 साली प्रतापसिंह राणे यांनीही अशाच पद्धतीने रात्री दीड वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यामुळे संपूर्ण गोमंतकीयांना 2005 सालची आठवण करून देणारी कालची रात्र ठरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा समारंभ पार पडला. सोमवारी रात्री 11 वाजता गडकरी यांच्यासह भाजप आणि मित्र पक्षांचे आमदार राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर मध्यरात्री गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन - सावंत

'पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी योग्यरितेनं पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,' अशी प्रतिक्रिया प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर दिली. 'सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. खूप काम करायचं आहे. पर्रिकरांएवढं काम करू शकणार नाही, पण नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन', असेही ते म्हणाले.

कोण आहेत प्रमोद सावंत?

प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत जवळचे असल्याचं म्हटलं जातं. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी कोल्हापूर येथील गंगा शिक्षण संस्थेतून आयुर्वेदाची पदवी घेतली.

सप्टेंबर 2018 मध्ये काँग्रेसने प्रमोद सावंत यांना विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी नोटीस दिली होती. कारण भाजपा सरकार अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.


वाचा :गोव्याने आपला चौकीदार गमावला - उद्धव ठाकरे


'चौकीदार' नरेंद्र मोदींना उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल झाले 'बेरोजगार'


VIDEO: पर्रिकरांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोपEXCLUSIVE VIDEO : लोकसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 06:43 AM IST

ताज्या बातम्या