मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘हे’ आहे देशातील मुस्लीम गाव; इथल्या प्रत्येक घरातील मुलगा लष्करात आहे...

‘हे’ आहे देशातील मुस्लीम गाव; इथल्या प्रत्येक घरातील मुलगा लष्करात आहे...

आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम (Prakasham) जिल्ह्यात हे गाव असून, त्याचं नाव आहे मल्लारेड्डी (Mallareddy)आहे. या गावाने देश रक्षणाची एक अनोखी परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम (Prakasham) जिल्ह्यात हे गाव असून, त्याचं नाव आहे मल्लारेड्डी (Mallareddy)आहे. या गावाने देश रक्षणाची एक अनोखी परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम (Prakasham) जिल्ह्यात हे गाव असून, त्याचं नाव आहे मल्लारेड्डी (Mallareddy)आहे. या गावाने देश रक्षणाची एक अनोखी परंपरा पुढे चालू ठेवली आहे.

आंध्रप्रदेश,26 जानेवारी: अनेक जाती-धर्म-पंथाचे लोक गुण्यागोविंदाने जिथं नांदतात तो देश म्हणजे भारत. या देशाचं सार्वभौमत्व, अखंडत्व टिकवून ठेवलं आहे, ते सीमेवर निधड्या छातीनं प्राणांची पर्वा न करता शत्रूला सामोऱ्या जाणाऱ्या वीर जवानांनी. धर्म, जात, पंथ यांच्यापलीकडे जाऊन आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतात ते वीर जवान. अशा वीर जवानांची परंपरा असणारी काही गावच्या गाव आपल्या देशात आहेत. असंच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे ते आंध्रप्रदेशात(Andhra Pradesh). प्रकाशम (Prakasham) जिल्ह्यात हे गाव असून, त्याचं नाव आहे मल्लारेड्डी(Mallareddy). इथले बहुतांश लोक मुस्लीम असून, या गावातील प्रत्येक कुटुंबातील एक तरी मुलगा देशाच्या सैन्यदलात(Indian Military) आहे. गेल्या अनेक वर्षांची ही या गावाची परंपरा आहे. या गावात 86 कुटुंब असून, सध्या त्यातील 130 सदस्य देशाच्या सैन्यदलात आहेत. आजतकनं या गावाची माहिती दिली आहे.

भारतावर झालेल्या प्रत्येक आक्रमणात शत्रूला धूळ चारण्यात या गावातील सैनिक आघाडीवर होते. मातृभूमीचे रक्षण करताना कोणताही धर्म आड येत नाही. याचं सार्थ उदाहरण म्हणजे हे गाव आहे, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी या गावातील लोकांची कामगिरी आहे. या गावातील प्रत्येक मुल भारतीय सैन्यात जाण्याचं स्वप्न बघतं. त्यांचा दिवस हे स्वप्न बघत उजाडतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीत, तयारीत संपतो. इथली डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए, एमसीए असे उच्चशिक्षण घेतलेली मुलेही भारतीय सैन्यदलातच आपली कारकीर्द घडवतात.

गावातील जुनी पिढीही नव्या पिढीला सैन्यात जाण्यासाठी प्रेरित करत असते. त्यासाठी नव्या मुलांना प्रशिक्षण देण्याची सोयही करण्यात आली आहे. सैन्य भरतीची जाहिरात येते तेव्हा मुलांना पाठवणं, परीक्षांची तयारी करून घेणं हे निवृत्त सैनिक स्वतः जातीनं लक्ष घालून करतात. इथली मुलं रोप क्लायबिंग, रनिंग असे खेळच जास्त खेळतात कारण याद्वारे त्यांची सैन्यदलात जाण्यासाठी तयारी होते. इतर गावांमधील तरुणांप्रमाणे इथले तरुण शेती किंवा हस्तकला असे व्यवसाय करत नाहीत, तर ते सैन्यात जातात.

सध्या सैन्यात जाण्याची तयारी करत असलेल्या अहमद बाशा यानं सांगितलं की, ‘माझे वडील सैन्यातून निवृत्त झाले आहेत, तर माझा भाऊ सैन्यात कर्तव्य बजावत आहे. मी सुद्धा सैन्यात जाण्याची तयारी करत आहे. मी या गावाचा रहिवासी आहे, याचा मला अभिमान आहे.’

हे देखील वाचा - Bal Puraskar 2021: धाडसी, निर्भिड, कलाकार आणि एकसे एक कल्पक 32 छोट्यांना मोठा सन्मान

या गावातील तीन-तीन पिढ्या सैन्यात आहेत. भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध, श्रीलंकेतील भारतीय शांती सेना यात त्यांनी सेवा बजावली आहे. सध्याही गावातील अनेक मुलं वेगवेगळ्या पदांवर कामगिरी बजावत आहेत. अगदी अलीकडं झालेल्या भारत-चीन संघर्षातही या गावातील सैनिकांनी शत्रूला खडे चारले आहेत.

या गावातील निवृत्त सैनिक कासीम अली म्हणाले की, ‘मी सैन्यदलात दाखल झालो आणि अलाहाबाद इथं प्रशिक्षण घेतलं. त्यांनतर सिकंदराबाद इथं कर्तव्यावर रुजू झालो. शिलॉंग मधील जम्मू 17 जाट रेजिमेंटमध्ये होतो. ब्रिगेडच्या मुख्यालयातही काम केलं. सर्वात शेवटी लडाखमध्ये कार्यरत होतो. 24 वर्ष देशाची सेवा करून मी अलीकडेच निवृत्त झालो आहे.’ कासीम अली अत्यंत अभिमानानं गावातील तरुण मुलांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरणा देतात.

सैन्यातून निवृत्त झालेले आणखी एक ज्येष्ठ सैनिक मस्तान म्हणाले, मी श्रीलंकेत कार्यरत असलेल्या भारतीय शांतीसेनेत सहभागी होतो. कारगिल युद्धात मी होतो. निवृत्त होताना मी देशाची पश्चिम सीमा असलेल्या राजस्थानमध्ये कार्यरत होतो. माझ्या दोन्ही मुलांना मी सैन्य दलात पाठवलं आहे. माझे दोन चुलत भाऊही सैन्यात आहेत. आमच्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे.’

https://www.aajtak.in/trending/photo/prakasam-a-muslim-village-of-andhra-home-of-gallantry-and-olive-uniform-tstk-1197471-2021-01-25-2

 

First published:

Tags: Andhra pradesh, India, Indian army, शहिदांना श्रद्धांजली. Kargil war