नवी दिल्ली 10 जून : विमान खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी पटेल आज ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झाले. त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी अपूर्ण असून पटेल यांना मंगळवारीही चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
चौकशीसाठी ईडीने पटेलांना दुसरी नोटीस पाठवली होती. युपीएच्या काळात 2004 ते 2011 या काळात पटेल हे नागरी उड्डयन मंत्री असताना या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पटेलांची चौकशी करणं महत्त्वाचं असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
या आधीही ईडीने पटेलांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. 6 जूनला हजर राहावं असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र पटेलांनी दुसरी तारीख मागितली होती त्यामुळे त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आलीय. 10 किंवा 11 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदारही आहेत.
Delhi: Former Civil Aviation Minister Praful Patel leaves from Enforcement Directorate office. He was questioned by the agency for nearly 8 hours today, in connection with multi crore airline seat sharing scam. He has been called tomorrow to complete his statement. pic.twitter.com/3sbuTSnHr3
— ANI (@ANI) June 10, 2019
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातला दलाल दीपक तलवार हा सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. त्याच्यावर जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यातही पटेलांचं नाव होतं. मात्र त्यांना आरोपी करण्यात आलेलं नाही. 2006 मध्ये एअरबस या कंपनीकडून 43 विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीने मंजूर केला होता. या करारानुसार कंपनीने 1 हजार कोटींची गुंतवणूक भारतात करणं अपेक्षीत होतं.
यात विमानांच्या देखभालीचं केंद्र, प्रशिक्षणाची व्यवस्था आणि इतर काही गोष्टींचा समावेश होता. मात्र या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा करारच रद्द करून टाकला होता. मध्यस्त असलेल्या दीपक तलवारने आपल्या संबंधांचा वापर करून विदेशी कंपनीला फायदा पोहोचवला त्यामुळे एअर इंडियाचं नुकसान झालं असा आरोप होतोय.
मध्यस्त दीपक तलवार आणि प्रफुल पटेल यांच्यात चांगले संबंध होते,त्याचाच फायदा घेण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे.