Home /News /national /

Exclusive: Viral Video मध्ये जॉबनंतर 10KM धावणारा कोण आहे प्रदीप? देशसेवेच्या स्वप्नासाठी सुरू आहे संघर्ष

Exclusive: Viral Video मध्ये जॉबनंतर 10KM धावणारा कोण आहे प्रदीप? देशसेवेच्या स्वप्नासाठी सुरू आहे संघर्ष

देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रदीप मेहरा (Pradip Mehra Viral Video) या अवघ्या 19 वर्षांच्या तरुणानं सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नोएडाच्या (Noida) रस्त्यावर रात्री 12 वाजता पाठीवर बॅग घेऊन धावणारा (Running Boy) प्रदीप मेहरा भारतीयांच्या चर्चेचा विषय ठरला आहे

पुढे वाचा ...
जावेद मन्सूरी, प्रतिनिधी नोएडा, 21 मार्च: काही माणसं ध्येयवेडी असतात. कोणताही अडथळा त्यांच्या स्वप्नांच्या मार्गात येऊ शकत नाही. आजच्या काळात अशी विजिगिषु वृत्ती तरुणाईत फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळेच देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रदीप मेहरा (Pradip Mehra Viral Video) या अवघ्या 19 वर्षांच्या तरुणानं सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नोएडाच्या (Noida) रस्त्यावर रात्री 12 वाजता पाठीवर बॅग घेऊन धावणारा (Running Boy) प्रदीप मेहरा सध्या देशाच्या कौतुकाचा विषय झाला असून, त्याचा धावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक त्याच्या जिद्दीचं, प्रमाणिक कष्टांचं भरभरून कौतुक करत आहेत. कितीही संकटं आली तरी हार मानू नका, असं नुसतं तोंडाने नाही तर कृतीनेही सांगणारा प्रदीप मेहरा हा नोएडात राहणारा एक 19 वर्षांचा तरुण आहे. आपलं स्वप्न आणि जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत तो धावत आहे. देशसेवा करण्यासाठी भारतीय लष्करात (Indian Army) भरती होण्याचं त्याचं स्वप्न आहे. मूळचा उत्तराखंडमधील अल्मोडा इथला रहिवासी असलेला प्रदीप आपल्या आईच्या उपचारांसाठी पैसे कमवण्याकरता आणि घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपलं घर सोडून नोएडात आला आहे. त्याचे वडील शेतकरी असून आई यकृताच्या आजारानं आणि टीबीनं आजारी आहे. तिच्यावर गावी उपचार सुरू आहेत. त्यासाठी कर्ज घेतलं असून त्याची परतफेड, आईच्या उपचाराचा खर्च यासाठी अर्थार्जन करण्यासाठी 12 वी उत्तीर्ण झाल्यावर प्रदीप कामासाठी नोएडाला आला. नोएडातील बरौला गावात एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत तो आपला मोठा भाऊ पंकज याच्यासोबत राहतो आणि नोएडा सेक्टर16 मधील मॅकडोनाल्‍डमध्‍ये नोकरी करतो. हे वाचा-मंदिरात दिसलेला तो नंबर ठरला लकी; पुजाऱ्याने जिंकली 4 कोटीची लॉटरी, केलं भलं काम प्रदीपची नोकरीची वेळ रात्री बाराच्या सुमारास संपते. त्यानंतर तो कंपनीतून घरी जाताना चक्क धावत जातो. कंपनी ते घर हे अंतर साधारण 10 किलोमीटर आहे. दररोज प्रदीप असाच धावत हे अंतर पूर्ण करतो. कारण त्याला सैन्यात भरती व्हायचं आहे. त्यासाठी आवश्यक व्यायाम करण्याच्या उद्देशाने तो धावतो. त्याला असं धावताना बघून गाडीतून जाणारे लोक त्याला घरी सोडण्याची तयारी दाखवतात, पण कधीही त्यासाठी होकार देत नाही. तो धावत राहतो... आपल्या ध्येयाच्या दिशेने. फिल्ममेकर विनोद कापरी यांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी गाडी चालवताना त्याला घरी सोडण्याबाबतही विचारले. पण या ध्येयवेड्या अवलियाने त्यांना नकार दिला. त्यांनी जेवण ऑफर केलं त्यालाही नकार दिला, कारण तो जेवला तर घरी भाऊ उपाशी राहिल. न्यूज 18 शी बोलताना प्रदीप मेहरा म्हणाला, 'लहानपणापासूनचं माझं स्वप्न आहे ते भारतीय लष्करात भरती व्हायचं. मात्र घरच्या आर्थिक स्थितीमुळे मला नोकरी करणं गरजेचं आहे. खोली भाडं 2500 रुपये असून, तिथं साधा पंखाही नाही. भाडं आणि इतर खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आईसाठी पाठवतो. त्यामुळे फार पैसे उरत नाहीत. तसंच सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक व्यायाम करण्यासाठी पैसे उरत नाहीत. नोकरीही सोडता येत नाही. नोकरीची वेळ संपल्यानंतर हातात फार वेळही उरत नाही. भाऊ रात्रपाळी करतो. त्यामुळे रात्री घरी गेल्यानंतर स्वयंपाक करावा लागतो.' व्यायाम करण्यासाठी वेगळा वेळ काढणं शक्य नसल्यानं अखेर हा उपाय शोधून काढला असल्याचं प्रदीपनं सांगितलं. त्याला पळताना बघून फिल्ममेकरने त्याला विचारलेल्या प्रश्नांना त्यानं दिलेली उत्तरं आणि त्यातून उलगडत गेलेली त्याची कहाणी सांगणारा हा व्हिडीओ लोकांचं मन जिंकत असून, हा व्हिडीओ बघून अनेकांचे फोन येत असल्याचं प्रदीपनं न्यूज 18 शी बोलताना सांगितलं. 'लोक मला खूप प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळत आहे. कितीही संकटं आली तरीही कोणतीही सबब शोधायची नाही, असा मी निर्धार केला आहे,' असं प्रदीपनं सांगितलं. हे वाचा-'हा तर भारतीय Iron Man'; हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक प्रदीपचा भाऊ पंकजनं आपल्या भावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'या व्हिडीओमुळे अनेक तरुणांचं मनोबल वाढेल. कधीही हार मानू नका, हा संदेश तो कृतीतून देत आहे. प्रदीप आधी गावात राहत होता. जेव्हा आईची तब्येत बिघडली तेव्हा मी त्याला इकडे बोलवून घेतलं तेव्हा कोणतीही सबब न सांगता तो इथं आला. तो कष्टाची नोकरी करतो; पण आपलं स्वप्न विसरलेला नाही, त्यासाठी तो अथक मेहनत घेत आहे. खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.' दरम्यान या 19 वर्षीय तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा, मनिष सिसोडियांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिंटींनी त्याचं कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रांनी या तरुणाला आत्मनिर्भर म्हटलं आहे. तर आर माधवन, विकी कौशल, रकुल सिंग, कियारा अडवाणी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या युवकाचं कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Indian army, Social media viral

पुढील बातम्या