आगरा 3 जानेवारी : देशाभरातल्याच शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त आहे तर उत्तर उत्तर प्रदेशात बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. चांगलं पीक आल्यानंतर भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. आगऱ्याच्या एका शेतकऱ्याने आपला 190 क्विंटल बटाटा महाराष्ट्रात विकला. सगळा खर्च जाऊन त्याच्या हातात फक्त 490 रुपये पडल्याची घटना पुढे आली आहे.
प्रदीप शर्मा हे उत्तर प्रदेशातल्या आगऱ्याचे प्रगतिशील शेतकरी आहे. गेली काही वर्ष त्यांनी बटाट्याचं चांगलं उत्पन्न घेतलं. पण त्या मालाला जसा भाव पाहिजे तसा त्यांना मिळत नाही. यावर्षी त्यांना 10 एकरात तब्बल 190 क्विंटल बटाटा झाला. महाराष्ट्रातल्या अकोल्याच्या बाजारात चांगला भाव असल्याने त्यांनी हा बटाटा विकायला आणला. मात्र त्यांचा बटाटा आला तेव्हा भाव कोसळले होते.
या विक्रितून त्यांना 94677 रुपये मिळाले. त्यातले 42030 रुपये मोटारभाडं, 993.60 रुपये हमाली, 828 रुपये काट्यांमध्य आलेली घट, 3790 दलाली, 100 रुपये ड्राफ्ट कमीशन, 400 रुपये इतर खर्चात गेले आणि हातात फक्त 1500 रुपये रोख मिळाले. त्यांचा एकूण खर्च 48187 रुपये झाला. त्यातले 46490 रुपये त्यांना मिळाले. कोल्ड स्टोरेजमध्ये 46,000 रुपये गेले. त्यानंतर त्यांच्या हातात फक्त 490 रुपये शिल्लक राहिले.
शर्मांनी ही रक्कम सर्व बील आणि पावत्यांसह पंतप्रधान कार्यालयाला मनी ऑर्डरने पाठवली आहे. पंतप्रधानांना शेतकऱ्यांचं दु:ख कळावं यासाठी त्यांच्या कार्यालयाला मनिऑर्डर केल्याचं स्पष्टीकरण शर्मा यांनी दिलंय. सरकार शेतकऱ्यांना जास्त उत्पदन काढायला सांगतं मात्र उत्पादन आल्यावर त्याला भाव देत नाही ही खंतही त्यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi, Potato farmer