जालोर: 10 नोव्हेंबर: प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. त्यावेळी व्यक्ती कायद्याचा विचार करत नाही की कोणत्याही शिक्षेचा. अशाच प्रकारची एक घटना राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या येथील पोलीस निरीक्षकांना ना कायद्याचं भान राहिलं ना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं. या पोलीस महाशयांनी आपल्या प्रेयसीच्या घरी बंदी असलेल्या वाळूचा ट्रॅक्टर भरून पाठवला. प्रेयसीच्या घराच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या या वाळूवर सध्या बंदी आहे. परंतु या महाशयांनी भरदिवसा आपल्या प्रेयसीच्या घरी ट्रॅक्टर भरून पाठवला.
या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यामध्ये या दोघांची चर्चा होताना ऐकायला मिळते. या पोलिसाचं वय हे 55 वर्षं आहे. या ऑडिओ क्लिपमधून कळतंय की, पत्नी बाजारात खरेदीला गेली असताना 5 मिनिटांसाठी का होईना पण आपल्या प्रेयसीला त्या पोलिसाने घरी येण्याचा आग्रह केला. त्यामुळे सध्या या परिसरात पोलीस महाशय व्हायरल होत आहेत. हे पोलीस महाशय आहेत जसवंतपुराचे एसएचओ साबिर मोहम्मद.
अशा पद्धतीने उतरले प्रेमाचे भूत
पोलीस आणि प्रेयसीमधील या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्यांवर या संदर्भात चर्चा झाल्यानंतर त्यांचं प्रेमाचं भूत उतरलं. त्याचबरोबर पोलीस अधिक्षकांनी तत्काळ या पोलीस महाशयांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिक्षक श्याम सिंह यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, ही ऑडिओ क्लिप समोर आली असून याच आधारावर जसवंतपुरा पोलीस स्टेशनच्या प्रभारींचे निलंबन केले आहे. त्याचबरोबर पुढील कारवाई सुरु आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. पोलिसांचं असं निलंबन होण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नसून याआधी देखील अनेक पोलिसांचे अशा पद्धतीने निलंबन झालं आहे.
अनेकदा पोलीस आपल्या अधिकारांचा गैरवापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना फायदा करून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण प्रेयसीला या पद्धतीने मदत करण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले.