नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : सोळाव्या लोकसभेचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपताना सगळेच सदस्य आज जुन्या आठवणीत रमले होते. शेवटच्या सत्रात सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भावना वक्त करत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी यांनी सर्वात शेवटी आठवण करत पाच वर्षातल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेतला आणि फटकेबाजी केली.
GST, तिहेरी तलाक, शत्रू संपत्तीकायदा, काळ्या पैशांविरोधातला कायदा अशा अनेक कायद्याला सभागृहाने मंजूरी दिली याबद्दल त्यांनी आभार मानले. गेली पाच वर्ष संसदेचं कामकाज जवळपास 100 टक्के पूर्ण करता आलं याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.
भाषणाच्या शेवटी मोदींनी फटकेबाजी केली, ते म्हणाले, गले पडना और गले मिलना याचा अर्थ मला या सभागृहात कळाला. आँखो की गुस्ताखीही याच सभागृहात बघायला मिळाली. मोदींच्या या वाक्यानंतर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावारच्या चर्चेच्या वेळी आपल्या आसनावरून मोदींजवळ जात त्यांची गळाभेट घेतली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या खासदाराला डोळाही मारला होता. त्यावर मोदींनी राहुल यांचं नाव न घेता टोला हाणाला.
तर काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या मोठ्याने हासण्याचाही त्यांनी उल्लेख केला. तसच टीडीपीच्या सदस्यांनी केलेल्या वेशभूषेचाही त्यांनी उल्लेख केला.
मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत - मुलायम
मुलायमसिंग हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या शेजारी बसले होते. त्यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर सगळेच मुलायमसिंग काय बोलणार आहेत याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुलायमसिंग म्हणाले, "सगळ्या सदस्यांना घेऊन हे सभागृह चालवणं हे अतिशय कठिण काम आहे. सगळ्यांचं समाधन करणं हे आव्हान असतं. पण नरेंद्र मोदी यांनी अतिशय कौशल्याने परिस्थिती हाताळली. आमच्या सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा. पुढच्या वेळीही नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो."
मुलायमसिंग यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी बाकांवरून टाळ्या पडल्या तर विरोधी बाकांवर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेजारी असलेल्या सोनिया गांधी यांनाही काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हते. गेल्या काही वर्षांपासून मुलायमसिंग आणि अखिलेश यादव यांच फारसं जमत नाही. त्यामुळे या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा