नवी दिल्ली, 1 मार्च : देशातल्या कोरोना लसीकरण (Corona Vaccination) अभियानाचा तिसरा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. या लशीचा पहिला डोस त्यांना देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी स्वत: फोटो ट्विट करत याबाबतची माहिती सर्वांना दिली.
लशीचे निवडणूक कनेक्शन
पंतप्रधान मोदी यांनी लस घेताना आसामचा (Assam) पारंपारिक गमछा परिधान केला होता. त्याचबरोबर पुदुच्चेरी (Puducherry) आणि केरळ (Kerala) या दोन भागातील नर्स या ठिकाणी उपस्थित होत्या. या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे. त्यामुळे या लशीच्या माध्यमातून भाजपाला बुस्टर डोस देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं सीएए (CAA) विरोधी संदेश लिहिलेले 50 लाख गमछे एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील एका प्रचार सभेत आसामी गमछा परिधान केला होता. त्यावर सीएए विरोधी मजकूर लिहिण्यात आला होता.
पी. निवेदा या पुदुच्चेरीच्या नर्सने पंतप्रधान मोदींना लस दिली. या केंद्रशासित प्रदेशात भाजपानं आजवर एकदाही सरकार बनवलेलं नाही. काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यानं सध्या तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत या ठिकाणी सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दक्षिण भारतामधील काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला असलेल्या पुदुच्चेरीमध्ये काँग्रेलसा हरवण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. तर केरळमध्ये आजवर भाजपाला कधीही मोठं यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीत ही कामगिरी सुधारण्याचा पक्षानं चंग बांधला आहे.
( वाचा : कोरोना लस घेतल्यानंतर काय म्हणाले पंतप्रधान? नर्सनं सांगितलं उत्तर )
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 27 मार्च, 1 आणि 6 एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान होणार आहे. तर केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. या सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Pm narenda modi