नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात नद्यांचं महत्त्व, स्वच्छता आणि व्होकल फॉर लोकल या मुद्द्यावर जोर दिला आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीला जो मान -सन्मान होता. तोच सन्मान आज युवा पिढी खादीला देत आहे. तसेच मला दिलेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेले पैसे 'नमामी गंगे मिशन'ला दिले जातील असंही मोदींनी यावेळी सांगितलं आहे.
1. गांधी जयंतीला खादी खरेदी करण्याचं आवाहन
यावेळी मोदी म्हणाले की, आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण अभिमानाने सांगू शकतो की, स्वातंत्र्य लढ्यात खादीला जो सन्मान होता, तोच सन्मान खादीला आजच्या तरुण पिढीकडून दिला जात आहे. याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 2 ऑक्टोबर रोजी बापूंच्या जयंतीला एक नवीन विक्रम करा. जिथे जिथे खादी, हातमाग आणि हस्तकला विकल्या जातात, त्या खरेदी करा. दिवाळीच्या तोंडावर व्होकल फॉर लोकलचा आवाज बुलंद करा.
2. गांधीजींनी स्वच्छतेला जनआंदोलनाचं रुप दिलं
मोदीजी आपल्या 'मन की बात'मध्ये पुढे म्हणाले की, छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठे बदल घडत असतात. स्वच्छतेच्या चळवळीने स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा दिली होती. गांधींनीच स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचं काम केलं होतं. गांधींजींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडलं होतं. इतक्या दशकांनंतर आता स्वच्छता चळवळीनं देशाला नवीन स्वप्नं पाहण्याची संधी दिली आहे.
3. जनधन खात्यांमुळे भ्रष्टाचार कमी झाला
जनधन खात्याची योजना सुरू केल्याने गरीबांचा पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होत असल्याचं देखील मोदींनी सांगितलं आहे. गावात मजुरी करणारा व्यक्तीदेखील यूपीआयचा वापर करत आपले व्यवहार करत आहेत. ऑगस्ट महिन्यांत 355 करोड यूपीआय ट्रान्झेक्शन करण्यात आले आहेत. तसेच सध्या देशात दररोज सरासरी 6 करोड रुपये डिजिटल ट्रान्झेक्शनद्वारे करण्यात येत आहेत.
हेही वाचा-अमित शहांनी बोलावली बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दिशेनं रवाना
4. नद्या भौतिक वस्तू नव्हे तर जिवंत घटक आहेत - मोदी
जागतिक नदी दिनाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्यासाठी नद्या या भौतिक वस्तू नाहीत, तर त्या जिवंत घटक आहेत. म्हणूनच आपण नद्यांना आई मानतो. त्यामुळे बहुतांशी सण, उत्सव नदी पात्रात पार पाडले जातात. तसेच माघ महिन्यात देशातील बरेच लोकं गंगा किंवा इतर कोणत्याही नदीच्या काठावर संपूर्ण महिना कल्पवास करतात. आपल्याकडे घरी आंघोळ करताना देखील नद्यांना स्मरण करण्याची परंपरा होती.
हेही वाचा-PM मोदींचा अमेरिकेतून थेट पुण्यात फोन; UPSC टॉपर शुभमचं केलं कौतुक!
5. भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेला पैसा 'नमामी गंगे मिशन'ला देणार
मोदीजी पुढे म्हणाले की, सध्या विशेष ई-लिलाव चालू आहे. यामध्ये मला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. यातून येणारा पैसा 'नमामी गंगे मिशन'ला देण्यात येणार आहे. देशभरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्था अनेक प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी तर स्वतःला अशा कामांसाठी समर्पित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.