Home /News /national /

LIVE PM Modi : 20 लाख कोटींचं पॅकेज; लॉकडाऊनध्येच मोदींनी दाखवलं स्वयंपूर्ण भारताचं स्वप्न

LIVE PM Modi : 20 लाख कोटींचं पॅकेज; लॉकडाऊनध्येच मोदींनी दाखवलं स्वयंपूर्ण भारताचं स्वप्न

21 वं शतक भारताचं आहे. ते साधायचा एकच मार्ग आहे. स्वयंपूर्ण भारताचा. मोदींनी जनतेशी साधलेल्या संवादात दिला नवा विश्वास

    नवी दिल्ली, 12 मे : 21 वं शतक भारताचं आहे. ते साधायचा एकच मार्ग आहे. स्वयंपूर्ण भारताचा. संकटातून संधी शोधायला हवी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला. त्यांनी आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा केली. देशाच्या GDP च्या 10 टक्के रक्कम असलेलं भरभक्कम पॅकेज त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेसाठी जाहीर केलं. 20 लाख कोटींचं हे पॅकेज पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, "जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांनी सुहृह गमावले आहेत. एका विषाणूने जगातल्या कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. सारं जग जीव वाचवायच्या लढाईत गुंतलं आहे. आपण कुणीच हे असं संकट यापूर्वी पाहिलेलं नाही. ऐकलेलंही नाही. मानवजातीसाठी हे सगळं अकल्पित आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. पण हरणं, थकणं, हार मानणं मानवाला मंजूर नाही." 21 वं शतक भारताचं मोदी म्हणाले, "कोरोनापूर्वीचं जग समजून घ्यायची संधी आपल्याला मिळाली आहे. 21 वं शतक भारताचं असेल हे आपलं स्वप्न नाही, तर जबाबदारी आहे. पण याचा मार्ग काय? जगातली आजची स्थिती आपल्याला शिकवते आहे, सांगते आहे एकच मार्ग - स्वयंपूर्ण भारत. आपल्याकडे शास्त्रांत सांगितलेला हा एकच रस्ता आहे - आत्मनिर्भर भारत. संकटात संधी शोधायला हवी." उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, "कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे." "भारताच्या प्रगतीमध्ये नेहमी वैश्विक प्रगती समाविष्ट आहे. भारताच्या कृतीचा प्रभाव वैश्विक कल्याणाकडेच असतो. ग्लोबल वॉर्मिंग, तणावमुक्ती यासाठी भारताने जगाला भेट दिली आहे. जगण्या-मरण्याच्या या जागतिक लढाईत आता भारताची औषधं कामास येत आहे. भारताची जगभर प्रशंसा होते, तेव्हा ती अभिमानाची गोष्ट असते." "संकटाचं रुपांतर संधीत करण्याची भारताची ही दृष्टी आपल्यासाठी प्रभावी ठरणार आहे. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलले आहे. जागतिकीकरणात या शब्दाचा अर्थ - अर्थकेंद्रित वैश्वीकरणापेक्षा मानवकेंद्रित जागतिकीकरण अभिप्रेत आहे." लॉकडाऊन 4.0 कोरोनाव्हायरसचं संकट संपलेलं नाही, असं सांगताना त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत, हे पंतप्रधानांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मास्क लावूनच काम करा. 18 तारखेनंतर चौथा लॉकडाऊन सुरू होईल. पण त्याचे नियम वेगळे असतील. त्याची माहिती 17 तारखेपर्यंत सविस्तरपणे सांगितली जाईल, असं ते म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या