नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारतात आज 16 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान (Coronavirus Vaccination) सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण अभियानाची (vaccination Programme) सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी देशातील वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं असून जगातील सर्वात मोठा कोरोना वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू होत असल्याचं सांगितलं.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- आज वॅक्सिन रिसर्चशी जोडलेले अनेक लोक, वैज्ञानिकांचं विशेष कौतुक आहे. जे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाविरोधात लस बनवण्यासाठी जुडले आहेत. साधारणपणे, एक वॅक्सिन बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जातो, मात्र आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी एक नाही, तर दोन मेड इन इंडिया वॅक्सिन तयार झाल्या आहेत.
- संपूर्ण देश आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता. कित्येक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरात लहान मुलं, वृद्ध, तरुण सर्वच जण कोरोना वॅक्सिन कधी येणार हाच प्रश्न विचारत आहेत. आता अतिशय कमी वेळात, लस आली आहे.
- काही वेळातच भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरू होत आहे. याबाबत मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.
- कोरोना वॅक्सिनचे 2 डोस घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोनाविरोधात आवश्यक शक्ती विकसित होईल, असं मोदी म्हणाले.
- इतिहासात, अशाप्रकारे आणि इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान यापूर्वी कधीही झालं नसल्याचं मोदींनी म्हटलंय. जगात 100 हून अधिक असे देश आहेत, ज्यांची लोकसंख्या 3 कोटींहून कमी आहे आणि भारत लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात 3 कोटी लोकांचं लसीकरण करत आहे.
- दुसऱ्या टप्प्यात आपल्याला हे 30 कोटी संख्येपर्यंत पोहचवायचं आहे. वृद्ध, गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना या टप्प्यात लस दिली जाईल. भारत,चीन आणि अमेरिका हे 30 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेले केवळ तीन देश आहेत.
- तसंच, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे मास्क घालून सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केलं आहे.
- मोदींनी लशीबाबत बोलताना सांगितलं की, आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ ज्यावेळी दोन्ही मेड इन इंडिया वॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी असल्याबाबत आश्वस्त झाले, त्यावेळीच या वॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.
- भारतातील वॅक्सिन, वैज्ञानिक, आपला आरोग्य विभाग, भारताची कोरोनाविरोधातील प्रक्रिया संपूर्ण जगात विश्वसनिय आहे. ज्याप्रमाणे आपण या माहामारीशी लढा दिला, त्याचं संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार, स्थानिक संस्था, सरकारी संस्था, सामाजिक संस्था एकत्र येऊन उत्तम कार्य करत आहे.
दरम्यान, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 3006 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. लसीकरणासंबंधी माहितीसाठी एक कॉल सेंटर 1075 ही तयार करण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात देशातील सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयातील तीन कोटी हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जाईल आणि ही पूर्णपणे मोफत असेल. याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा काही आठवड्यात पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनवण्यात आलं आहे. निवडणूकांप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी बूथ तयार करून कोरोना लस देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.