Chandrayaan-2: तुम्ही देशासाठी अमूल्य योगदान दिलं, PM मोदींकडून शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Chandrayaan-2: तुम्ही देशासाठी अमूल्य योगदान दिलं, PM मोदींकडून शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप

नरेंद्र मोदी यांनी निराश झालेल्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

बंगळुरू, 7 सप्टेंबर : चंद्रावर उतरण्याच्या भारताच्या कित्येक वर्षांच्या स्वप्नाला अपेक्षित यश आलं नाही. पण इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. 'आपल्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली आहे. देश तुमच्या पाठीशी आहे,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी निराश झालेल्या शास्त्रज्ञांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

'तुम्ही भारतमातेसाठी जगणारे लोक आहात. जीवनात चढ-उतार येत असतात. शेवटच्या क्षणी आलेल्या अपयशाने तुमचं यश झाकणार नाही,' असं म्हणत नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. विक्रम लँडर चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर आणि एक मिनिटाच्या अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान विक्रम लँडरच्या चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरू झाली. विक्रम आणि चंद्रातलं अंतर कमी करण्यात इस्रोला यश आलं. पण सॉफ्ट लँडिंगचा शेवटच्या खडतर टप्प्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं असतानाच विक्रमकडून सिग्नल येणं बंद झालं. त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी नजरा लावून बसलेल्या भारतीयांची निराशा झाली. मात्र ही मोहीम शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणं हेही एक मोठं यश असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे. यातून इस्त्रोला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत.

नेमकी काय झालं? या आहेत त्या 3 शक्यता

पहिली शक्यता - वेग कमी करत असताना लँडर 'विक्रम'मध्ये अचानक तांत्रिक दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपर्क तुटू शकतो. नंतर काही वेळाने पुन्हा संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो. मात्र आता त्याची शक्यता खूपच कमी आहे.

दुसरी शक्यता - लँडर 'विक्रम' चंद्रावर उतरलं असावं मात्र त्याचा संपर्क तुटला असावा अशीही शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे तो संपर्क तुटला असावा. असं झालं असेल तर मात्र पुन्हा संपर्क करणं अवघड आहे.

तिसरी शक्यता - लँडर 'विक्रम' शेवटच्या टप्प्यात खाली येत असताना चंद्रावर आदळून ते नष्ट झालं असेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण त्यावेळचा त्याचा वेग आणि तिथली परिस्थिती यामुळे असं होण्याची शक्यता जास्त आहे.

या तीन शक्यता असल्या तरी त्या प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत विक्रमकडून आलेल्या माहितीचं सखोल विश्लेषण केलं जात नाही तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढता येत नसल्याचं इस्रोच्या तज्ज्ञांचं मत आहे.

Chandrayaan-2 : अंतिम टप्प्यात विक्रम लँडरसोबत नेमकं काय झालं असेल?

Published by: Akshay Shitole
First published: September 7, 2019, 8:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading