सुरत 3 मार्च : भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन जे हल्ले केले त्यात 250 दहशतवादी ठार झाल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. सुरत इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. हल्ल्याला आता आठवडा उलटून गेल्यानंतर विरोधी पक्षांनी पुरावे मागायला सुरुवात केलीय. तर विरोधक जवानांचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत.
अमित शहा म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक झाल्यावरही विरोधीपक्षांनी पुरावे मागितले होते. आता हवाई हल्ल्यानंतरही पुरावे मागितले जात आहेत. विरोधकांच्या या मागणीमुळे पाकिस्तानात अनेकांच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं आहे.
जवानांनी ज्या शौर्याने हा हल्ला केला त्याचा हा अपमान असल्याचा आरोपही अमित शहा यांनी केला आहे.
'मोदींनाच निवडून द्या, नाहीतर दहशतवादी करतील संसदेवर हल्ला'
भारताच्या हवाई दलाने बालाकोट इथल्या दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याचं आता राजकारण सुरू झालंय. विरोधक पुरावा मागत आहेत तर भाजपकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जातोय. भाजपचे आसामचे मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
आसाममधल्या कामपूर इथं बोलताना सर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनाच जिंकून द्या. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवादी पुन्हा भारताच्या संसदेवर हल्ला करतील. एवढच नाही तर ते दहशतवादी आसामच्याही संसदेवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
सर्मांच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मतं मिळविण्यासाठी भाजप हल्ल्याचं राजकारण करतेय असा आरोप होतोय. तर विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
मोदींचा अमेठीत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक वार करत म्हटलं की, काही लोक येता-जाता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन इंदूरसंदर्भात भाषण देत फिरत आहेत. पण हा मोदी आहे ज्याने 'मेड इन अमेठी' चे स्वप्न सत्यात उतरवले आहे.