नवी दिल्ली 10 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशातील विद्यार्थ्यांकडे नेहमी लक्ष असतं. ते अधून-मधून 'परीक्षा पे चर्चा' नावाच्या सत्रात विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधतात. याशिवाय, एखाद्या विद्यार्थ्यानं उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर त्याचं जाहीरपणे कौतुकही करतात. आताही पंतप्रधान मोदींनी बेंगळुरू येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी, आदित्य दीपक अवधानी या मुलाचं कौतुक केलं आहे. पीएम मोदींनी आदित्यचं कौतुक केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, या मुलानं असं काय केलं की पंतप्रधान त्याचं कौतुक करत आहेत. आदित्यनं कागदांची नासाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बेंगळुरूमधील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की, त्यांचा मुलगा प्रत्येक शैक्षणिक वर्षानंतर त्याच्या वह्यांमध्ये शिल्लक राहिलेले कोरे कागद काढतो आणि ते बाईंड करतो. या कागदांपासून तयार केलेल्या वहीचा तो 'रफ कॉपी' म्हणून वापर करतो. ट्विटसोबत त्यांनी डेस्कवर ठेवलेल्या कागदांच्या गठ्ठ्याचा फोटोही शेअर केला होता. डॉ. दीपक यांचा मुलगा आदित्य हा 'दीपक अवधानी दीन अकॅडमी'चा विद्यार्थी आहे.
परीक्षेचा तणाव आहे का? प्रेशर कमी करण्यासाठी या पालकांचा आगळावेगळा प्रयोग, VIDEO
पोस्ट झटपट व्हायरल झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हे ट्विट रिट्विट केलं आहे. पंतप्रधानांनी लिहिलं, "शाश्वत जीवनाचा एक चांगला संदेश देण्याचा हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न आहे. तुमचं आणि तुमच्या मुलाचं अभिनंदन. इतरांनीही असेच प्रयत्न शेअर केले पाहिजेत, ज्यामुळे पुनर्वापर आणि 'संपत्तीचा अपव्यय' याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल."
डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांची रिसायकलिंग पेपरवरील पोस्ट पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर आणखी व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सनी आदित्यच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. पीएम मोदींच्या रिट्विटवर एका युजरनं कमेंट केली की, 'मी माझ्या मुलींच्या नोटबुक आणि पेपर्सबाबतही असंच काहीसं करतो. त्यांना बाईंड नाही केलं पण, रफ ड्राफ्ट आणि डूडलिंग इत्यादींसाठी त्यांचा वापर होतो.'
शिल्पकारांचं गाव, प्रत्येक घरातून येतो हातोडा, छिन्नीचा आवाज, जाणून घ्या काय आहे प्रकार?
आदित्य म्हणाला, "मला आश्चर्य वाटतं की, पंतप्रधानांनी माझ्या वडिलांचं ट्विट रिट्विट केलं. ही अभिमानाची बाब आहे. प्रत्येक उन्हाळ्यात शाळा संपली की मी आणि माझी आई एकत्र बसतो आणि प्रत्येक वहीतील उरलेली काही पानं काढून त्यांना स्पायरल बाइंडिंग करून घेतो. या कागदांचा वापर मी गणितं सोडवायला आणि इतर कच्च्या कामांसाठी करतो. आपण वस्तू वाया घालवण्याऐवजी ती पुन्हा कशी वापरता येईल याचा विचार केला पाहिजे."
आदित्यची आई वर्षा रघुरामन म्हणाल्या, "माझ्या आई-वडिलांनी मला लहानपणी ही सवय लावली होती. मीदेखील माझा मुलगा प्राथमिक वर्गात असल्यापासून त्याला ही सवय लावली." डॉ. दीपक म्हणाले की, त्यांचं ट्विट व्हायरल झाल्यानं ते खूप आनंदात आहेत. येणाऱ्या पिढीवरही या उपक्रमाचा प्रभाव पडेल अशी त्यांना आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.