मुंबई, 24 जून : 'देशातील राज्यांची संख्या 50 करण्याची मोदी सरकारची (Modi Government) योजना असून महाराष्ट्राचे विभाजन करून दोन राज्य होणार आहेत,' असा दावा भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असून 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर ते हा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाचे मंत्री उमेश कुट्टी (Umesh Kutti) यांनी हा दावा केलाय. कुट्टी हे कर्नाटकमधील वरिष्ठ भाजपा नेते असून बोम्मई सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत.
काय आहे योजना?
कुट्टी यांनी बेळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशातील राज्यांची संख्या 50 करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माझी माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्येचं ओझं वाढल्यानं राज्याचं विभाजन करणे हे चांगले असल्याचा दावा कुट्टी यांनी केला.
कोणत्या राज्यांची होणार विभागणी?
50 राज्यांच्या मागणीला यावेळी पाठिंबा दिला. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातून दोन तर उत्तर प्रदेशातून चार राज्यांची निर्मिती करण्यात यावी असं मत त्यांनी व्यक्त केल. लहान राज्यांची निर्मिती झाल्यानंतर रोजगार आणि विकासाच्या अधिक संधी निर्माण होतील. त्यातून देशाच्या विकासाला चालना मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
गुजरात दंगल प्रकरण : पंतप्रधानांना मोठा दिलासा; मोदींविरोधातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
बोम्मईंनी फेटाळले वक्तव्य
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी उमेश कुट्टी यांचा दावा फेटाळला आहे. उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा कोणताही विचार नाही. देशातील राज्यांची संख्या वाढवून 50 करण्याच्या प्रस्तावाची आपल्याला कोणतीही माहिती नसून केंद्र सरकारनं याबाबत आपल्याशी काहीही चर्चा केली नाही, असं बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.