Home /News /national /

पहिल्यांदा कोणाला मिळणार लस? मोदींनी केलं स्पष्ट; उद्धव काय म्हणाले तेही वाचा

पहिल्यांदा कोणाला मिळणार लस? मोदींनी केलं स्पष्ट; उद्धव काय म्हणाले तेही वाचा

देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा वाढायला लागल्यामुळे पंतप्रधान मोदींनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची (PM Modi meeting) बैठक घेतली.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : "काही लोक कोरोना लशीवरून (Corona vaccine) राजकारण करत आहेत. पण लस कधी येणार हे आपल्या हातात नाही. ते आपण ठरवू शकत नाही. फक्त लस (Covid vaccine) आल्यानंतर कोणाला प्राधान्याने ती दिली पाहिजे याबाबत स्पष्टता आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi meeting) यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केलं. देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा वाढायला लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी गुजरात, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हर्च्युअल मीटिंग घेतली. त्यामध्ये गृहमंत्री अमित शाहा देखील सामील झाले होते. "लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीने राबवली पाहिजे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आतापासून तयारी करणं आवश्यक आहे. आपल्या आरोग्य सेवकांना आणि आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस मिळेल याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे", असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना थांबवत मोदींनी विचारलं तयारीबद्दल बोला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या बैठकीत त्यांच्या राज्यातले कोरोना रुग्णांचे ताजे आकडे सांगायला सुरुवात केली. त्यावर मोदींनी त्यांना थांबवत, 'आकडे नको, तयारी काय ते सांगा', असं सुनावलं. तुमचं राज्य कोरोना साथीचा सामना करण्यासाठी काय करत आहे, आतापर्यंत काय केलं आहे आणि पुढचा काय प्लॅन आहे ते सांगा, असं मोदींनी त्यांना सांगितलं. काय म्हणाले उद्धव ठाकरे? मोदींबरोबरच्या बैठकीत महाराष्ट्र वाढत्या कोरोना रुग्णांबाबत काय उपाययोजना आणि काय तयारी करत आहे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. त्याबरोबरच त्यांनी कोरोना लस उपलब्ध होईल तेव्हा लसीकरण कसं राबवायचं हाही मुद्दा मांडला. महाराष्ट्राने त्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. कोरोना लस गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावी आणि लसीकरण सुरळीत व्हावं हे या टास्क फोर्सचं काम असेल. आपण लशीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांच्या सतत संपर्कात असल्याचंही ठाकरे यांनी मोदींना सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या