नवी दिल्ली,ता.29 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात मध्ये प्रत्येक वेळी नागरिकांनी पाठवलेल्या सूचनांचा, माहितीचा आवर्जुन उल्लेख करत असतात. आजच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या आषाढी वारीचा उल्लेख केला आणि देशवासियांना माहिती दिली. कोल्हापूरच्या संतोष काकडे यांनी फोन करून पंतप्रधानांना वारीची माहिती देण्याची विनंती केली होती. तोच धागा घेऊन पंतप्रधानांनी वारीची महती देशवासियांना दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांनी सामाजिक एकतेच्या धाग्यात सर्वांना गुंफलं, अंधश्रध्देवर प्रहार केले. माणसां माणसांमधलं देवत्व जागृत केलं. वारीत लाखो वारकरी पवित्र तिर्थक्षेत्रं असलेल्या पंढरपूरमध्ये जातात. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विठ्ठलाचं नाव घेत, नाचत, गात, आनंदाने हे लोक 20 ते 20 दिवस चालत पंढपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि वर्षभराची ऊर्जा घेतात. 'वारी'चा हा सोहोळा अतिशय अद्भूत असतो. तो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून देशवासियांना केलं.
संतोष काकडे हे कोल्हापूरमध्ये माधव नेत्रपेढीत काम करतात. पंतप्रधानांनी आपल्या सूचनेचा मन की बात मध्ये समावेश केल्याने त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केलाय. महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेल्या आषाढी वारीची माहिती देशवासियांना दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले.
हेही वाचा...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 'मन की बात', Aashadhi wari, Mann ki baat, Narendra modi, Pandharpur, Vitthal, आषाढी वारी, नरेंद्र मोदी, पंढरपूर, विठ्ठल