#PGStory : गर्लफ्रेंड आणि मी हॉस्टेलच्या खोलीत; बाबा नेमके दरवाजात

#PGStory : गर्लफ्रेंड आणि मी हॉस्टेलच्या खोलीत; बाबा नेमके दरवाजात

मुलांच्या हॉस्टेलमध्ये तर वेगळंच वातावरण असतं. त्या बंद खोल्यांमध्ये अनेक गुपितं असतात हे ही तितकचं खरं.

  • Share this:

मुंबई, 9 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

ही कथा आहे 32 वर्षीय दीपकची. (नाव बदललं आहे) घरापासून विद्यापीठ लांब असल्याने दिल्लीतच दीपकने पीजीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 3 वर्ष दीपकने पीजीमध्ये राहून शिक्षण घेतलं. यादरम्यान त्याच्या अनुभवांच्या शिदोरीमधील एक कथा.

एम.एचं शिक्षण पुर्ण केलं होतं. 2003 मध्ये रिसर्च करीत होतो. घरापासून लांब आणि विद्यापीठापासून जवळ मुनिरका येथे एक पीजीमध्ये राहण्याची सोय झाली होती. तेथे आम्ही पीजी मालकीण काकूंपासून लपून-छपून मैत्रिणींना खोलीत घेऊन येत होतो. तशी ही साधारण बाब होती... मुनिरकाच्या भागातील तिसऱ्या माळ्यावर एक लांब लॉबी होती. लॉबीच्या दोन्ही बाजूला 3-3 चौकोनी खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत एक स्वयंपाकघर आणि बाथरूम होतं. एका खोलीत दोघेजण राहत होतो. मैत्रिणी असलेल्या तरुणांचा या पीजीमध्ये दरारा होता. कारण त्या आल्यावर इतरही मुलांना चांगलं-चुंगल खायला मिळायचं. आमच्या माळ्यावर माझी आणि पंकजची गर्लफ्रेंड होती.

माझ्या खोलीत मी आणि वरुण राहत होतो. जेव्हा माझी गर्लफ्रेंड यायची तेव्हा तो बाहेर जायचा आणि जेव्हा त्याची गर्लफ्रेंड यायची तेव्हा मी बाहेर जात असे. मालकीणीला फसवण्यासाठी आम्ही दाराबाहेर कुलूप लावून जात असते. त्यामुळे मालकीणीला संशय येत नव्हता.

साधारण 12 वाजून गेले होते. दुपारी मी आणि माझी मैत्रिण पीजीमध्ये मॅगी तयार करत होतो. तेवढ्याच कोणीतरी दार ठोकलं. अशावेळेस कोणताही मित्र येणं शक्य नव्हतं, कारण तसा नियमचं होता. याचा अर्थ कोणीतरी अनोखळी बाहेर आलं असावं असं मला वाटलं. पण कोण आहे, ज्याला कुलूपही दिसलं नाही. खिडकीतून पाहिलं तर बाहेर बाबा उभे होते.

तेव्हा पायाखालची जमिनच सरकली. पीजी मालकीणीला वेड्यात काढू शकतो, पण बाबांना काय समजावणार की कुलूपबंद खोलीत मुलीसोबत काय करीत होतो. अशातच माझा मित्र देवदूतासारखा खोलीच्या बाहेर प्रकट झाला. त्याला नेमकी अडचण लक्षात आली.

'काका...नमस्कार! तुम्ही इथे? अहो दीपक तर आज एक्स्टा क्लासेससाठी बाहेर गेला आहे. मला माहीत असतं तुम्ही येणार आहार तर मी घरीच थांबलो असतो. दीपक तर किल्लीपण सोबत घेऊन गेला आहे. तुम्ही माझ्यासोबत या. खाली कॉमन रुममध्ये थांबूया.' असं म्हणत रुममेट वडिलांना खाली घेऊन गेला. तातडीने आम्ही खोलीतून बाहेर पडलो. मैत्रिणीला खाली घेऊन जाऊ शकत नव्हतो. तिला समोरच्या खोलीत शिफ्ट केलं. पीजीमध्ये अनेकदा शेजारी राहणाऱ्या मित्राच्या खोलीची किल्ली एकमेकांकडे असते. मी मॅगीचं बाऊल मैत्रिणीला दिला. मैत्रिण असल्याचे खोलीतील सर्व पुरावे नष्ट केले. पीजीमध्ये पायऱ्यांजवळ असलेल्या मागच्या दाराने बाहेर पडलो आणि पुन्हा मुख्य गेटमधून आत शिरलो. ‘अरे बाबा, तुम्ही इथे...तुम्ही सांगितलं नाही...फोन केला असता...मी क्लासमध्ये होतो.’

रुममेटने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. सर्व ठीक असल्याने मी बाबांना घेऊन वरच्या खोलीत गेलो. बाबांना खोलीत बसवलं आणि आम्ही गप्पा मारत होतो. तेवढ्यात बाहेरुन ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज नाही माझ्या मैत्रिणीचा होता आणि नाही त्या खोलीत राहणाऱ्या मित्राचा. मग आवाज होता कोणाचा? मी पटकन खोलीबाहेर गेलो. बघतो तर काय माझ्यासमोरच्या मित्राचे बाबा साक्षात दारासमोर उभे होते आणि त्यांच्यासमोर माझी मैत्रिणी. मित्रासाठी आणलेला नवाकोरा कम्प्युटर त्यांच्या हातात होता. हे दृश्य पाहून काय करावं कळतं नव्हतं. समोरच्या खोलीत राहणाऱ्या पंकजचे बाबा तिला आणि पंकजला खूप टाकून बोलत होते. ही मुलगी माझ्या घरची सून होणार नाही, असं ओरडून सांगत होते. तर दुसरीकडे खोलीत बसलेल्या माझ्या बाबांची कॉलर ताट झाली होती. सध्याची पिढी कुठे चालली आहे…माझा मुलगा मात्र सुट्टीच्या दिवशीही एक्स्टा क्लासेसला जातो हा विचार करुन त्यांचा ऊर भरून आला होता.

इकडे मात्र पंकजची पुरती वाट लागली होती. तिकडे माझी मैत्रिण बोलण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र बाबा समोरचं असल्यानं मी काहीच करू शकत नव्हतो. हा प्रसंग माझ्यासाठी खूप त्रासदायक होता.

या घटनेला आता 15 वर्ष उलटून गेली. मात्र पंकजच्या वडिलांप्रमाणे त्या मैत्रिणीनेही आजपर्यंत आम्हाला माफ केलं नाही.

हे वाचा -'ब्रा कडे पाहून ते शेरेबाजी करत' - नवी मुंबईत शिक्षकाविरोधातच धक्कादायक तक्रारी

First published: May 9, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या