मुंबई 25 फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून देशभरात पेट्रोलच्या किंमतीनं आभाळ गाठलं आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर दराजवळ गेलं असून राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) काही भागांमध्ये तर पेट्रोलनं 100 चा आकडा पार केला आहे. यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं असून बजेट देखील बिघडलं आहे. परिणामी अनेक राज्यांनी आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या दरांमध्ये कपात (Tax cut) केली आहे. फायनॅन्शियल एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार देखील नागरिकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या तज्ज्ञांनी (Bofa) केंद्र सरकार प्रतिलिटर 5 रुपयांची कपात करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 60 डॉलर झाल्यानं ग्राहकांवरील बोजा कमी करण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार असल्याचा अंदाज या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. 2021-22 या वर्षासाठी आम्ही आमची वित्तीय तूट 30 बेसिस पॉईंटने वाढवून जीडीपीच्या 7.5 टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. प्रतिलिटर 5 रुपये भाव कमी केल्यानं केंद्राचे उत्पन्न सुमारे 71 हजार 760 कोटी रुपयांनी कमी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत कच्च्या तेलाची किंमत ही प्रतिबॅरल 50 डॉलर होती. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन ती 62 डॉलर प्रतिबॅरल इतकी झाली आहे. 2021 च्या मध्यापर्यंत कमी मागणीमुळे भारतीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे 19 डॉलर ते 44 डॉलरपर्यंत राहण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
अवश्य पाहा - सूर्यकुमार यादवनं 26 बॉलमध्ये काढले 120 रन! मुंबईनं केला सर्वात मोठा स्कोअर
तेलाच्या कमी वापराच्या अंदाजांमुळं 2021-22 या वित्तीय वर्षाचा आमचा 9 टक्क्याच्या वाढीचा अंदाज आम्ही कायम ठेवला आहे. परिणामी जास्त वित्तीय तुटीमुळे उत्पन्नावरील ताण कमी होण्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने मागील काही दिवसांत पेट्रोलच्या भावानं मोठी उसळी मारली आहे. काल दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 90.93 रुपये इतका झाला होता. मागील काही दिवसांपासून यामध्ये 5.23 रुपये प्रतिलिटर इतकी वाढ झाली आहे. सध्या केंद्र सरकार डिझेलवर 31.83 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोलवर 32.98 रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या टॅक्सचा समावेश आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या कराचा देखील समावेश झाल्यानंतर ग्राहकांना खूप जास्त किंमत मोजून इंधन खरेदी करावं लागत आहे.
दरम्यान, मार्च आणि मे2020 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील सरचार्जमध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. यात पेट्रोलवर 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये सरचार्जची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये खूप मोठी वाढ झाली होती. 1 फेब्रुवारीपासून नवीन कृषी पायाभूत सेसमधील फायदा थेट ग्राहकांना मिळण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमतीच्या अधिभारात प्रतिलिटर 1 रुपये कपात केली गेली आहे, याचबरोबर मूलभूत उत्पादन शुल्कामध्ये देखील 1.4 रुपये पेट्रोलमध्ये आणि 1.8 प्रतिलिटर लीटर डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.त्यानंतर आता वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिलिटर5 रुपये कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. हा दिलासा कधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Madhya pradesh, Petrol, Petrol and diesel price, Rajasthan