मराठी बातम्या /बातम्या /देश /

मिरवणूक, गावजेवण आणि बरंच काही! गावकऱ्यांनी शिक्षकाच्या बदलीच्या वेळी केला शानदार निरोप समारंभ

मिरवणूक, गावजेवण आणि बरंच काही! गावकऱ्यांनी शिक्षकाच्या बदलीच्या वेळी केला शानदार निरोप समारंभ

Teacher

Teacher

आंध्रप्रदेशातील मल्लूगुडा गावात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नरेंदर गौडू यांना गावकऱ्यांनी एखाद्या सणासारखा निरोप समारंभ दिला आहे.

आंध्र प्रदेश, 04 फेब्रुवारी: मुलांना योग्य मार्ग दाखविणारे, कर्तव्यनिष्ठ शिक्षक नेहमीच सगळ्यांच्या स्मरणात राहतात. मुलांच्याच नव्हे तर पालकांच्या मनातही अशा शिक्षकांसाठी अतिशय आदराचं, प्रेमाचं स्थान असतं. आंध्र प्रदेशातील एका छोट्याशा खेडेगावातील एका शिक्षकानं आपल्या कामानं अख्ख्या गावाचं मन जिंकलं. गावातील लोक आणि हा शिक्षक यांच्यात इतकं घट्ट नातं निर्माण झालं की दहा वर्षांनी त्यांची बदली झाली तेव्हा कोणीही त्यांना जायला द्यायला तयार नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले; पण जाणं अपरिहार्य आहे, हे कळल्यावर सगळ्या गावानं या शिक्षकाला असा शानदार निरोप दिला की शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. सध्या सगळीकडे या गावाची, या शिक्षकाची आणि या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे.

नरेंदर गौडू असं या शिक्षकाचं नाव आहे. आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील गुम्मालक्ष्मीपुरम मंडलातील मल्लूगुडा या छोट्याशा आदिवासी पाड्यावरील सरकारी शाळेतील शिक्षक म्हणून ते 2011 मध्ये रुजू झाले. दररोज वीस किलोमीटरचा प्रवास करून ते इथल्या शाळेत येत असत. 42 कुटुंब असणाऱ्या या छोट्याशा वस्तीवरील शाळेत मुलं तरी किती असणार; पण त्या 30-32 मुलांसाठी ते रोज शाळेत येत. फक्त शाळेतील अभ्यासच नाही तर या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले.

(हे वाचा-पार्लरमध्ये जाऊन Facial करून आली महिला, चेहऱ्याची झाली अशी अवस्था...)

या मुलाचं सामान्य ज्ञान वाढावं, त्यांना खेळ, इतर कला कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी नरेंदर गौडू यांनी विविध उपक्रम राबवले. एवढचं नव्हे तर संकटाच्या काळात मुलांच्या कुटुंबासाठी त्यांनी समुपदेशकाची भूमिकाही बजावली. वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज भरून देणे, माहिती देणे अशी कामंही त्यांनी केली. त्यामुळं अल्पावधीतच नरेंदर गौडू यांना गावातील लोक आपल्यातीलच एक समजू लागले. गावकारी आणि गौडू यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.

2011 नंतर 5 वर्षांनी बदलीची वेळ आली तेव्हा गौडू यांची बदली याच गावात करण्यात आली त्यामुळं त्यांना इथंच आणखी पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी आणखी एक शिक्षक देण्यात आला. त्यामुळं पाचवीपर्यंत वर्ग करणे शक्य झाले. गौडू शाळेचे मुख्याध्यापक झाले. आता या शाळेत 32 मुलं शिक्षण घेत आहेत. दहा वर्षे या गावात काढल्यानंतर या जानेवारीमध्ये गौडू यांची बदली याच मंडलातील दुसऱ्या गावी झाल्याचं पत्र त्यांना मिळालं. ही बातमी कळताच शाळेतील मुलांच्या डोळ्यातून पाणी  वाहू लागलं. गावकऱ्यांची अवस्थाही वेगळी नव्हती; पण नोकरी असल्यानं आणि कुटुंबाच्या पालन पोषणासाठी नोकरी करणं गरजेचं असल्यानं बदलीच्या गावी जाणं गौडू यांना भाग होतं.

(हे वाचा-बसने पाठीमागून दिली धडक, ट्रॅक्टरमधून 2 तरुण पडले आणि ट्रॉली खाली सापडले, VIDEO)

अखेर गावकऱ्यांनी वास्तव स्वीकारलं, मात्र आपल्या या लाडक्या शिक्षकासाठी असं काहीतरी करायचं ठरवलं जे त्यांच्या कायम स्मरणात राहील. याच भावनेनं गावानं गौडू यांच्या निरोप समारंभाचा घाट घातला. संपूर्ण गावानं त्यांचा निरोप समारंभ एखाद्या सणासारखा साजरा केला. 31 जानेवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौडू यांचा फोटो असलेला फलक, पताका लावण्यात आल्या होत्या. गौडू यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आलं होतं. गौडू आणि त्यांचे कुटुंबीय गावात आल्यानंतर गौडा यांचे पाय हळदीच्या पाण्यानं धुण्यात आले. त्यानंतर त्यांना खांद्यावर बसवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अख्खं गाव ढोलाच्या तालावर नाचत होतं. गात होतं. सगळ्या गावाला गोडधोड जेवण देण्यात आलं. गौडू यांना गावानं गोदरेजचे कपाट, चांदीची भेटवस्तू आणि सिलिंग फॅन भेट दिला. याशिवाय त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वस्त्रं देऊन सन्मान करण्यात आला. हा सगळा सोहळा बघून गौडू अतिशय भारावून गेले होते.

द न्युज मिनिटशी बोलताना ते म्हणाले, ‘मी अपेक्षा केली नव्हती असा भव्य निरोप समारंभ गावानं केला आहे. ज्या सन्मानानं त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला वागवलं आहे ते बघून मी अतिशय आनंदी झालो आहे. या छोट्याशा पाड्यातील गरीब लोकांनी तब्बल 30 हजार रुपये यासाठी खर्च केले असतील. गावाचा एखादा उत्सव असावा तसा माझा निरोप समारंभ गावानं साजरा केला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या पेक्षा मोठी भेट काय असू शकते? मी कधी अशा सन्मानाची अपेक्षा केली नव्हती.’

(हे वाचा - शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या विदेशी सेलेब्रिटींना परराष्ट्र मंत्रालयाचं खरमरीत उत्तर)

गौडू यांच्या अशा निरोप समारंभाची बातमी या मंडलचे शिक्षण अधिकारी जे. नारायणस्वामी यांच्यापर्यंत पोहोचली. त्यावर ‘गावानं एखाद्या शिक्षकाला असा सन्मानपूर्वक निरोप द्यावा, ही फार भारावून टाकणारी गोष्ट आहे. गावासाठी ते फक्त शिक्षक नव्हते तर त्याहून अधिक होते, याचंच हे प्रतीक आहे. हे गाव गौडू यांच्या कायम स्मरणात राहील’, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मल्लूगुडा गावात शिक्षक म्हणून आलेल्या नरेंदर गौडू यांनी केवळ ज्ञानदानापुरतं सीमित न राहता गावाच्या भल्यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या कामाची भरपाई कशानं ही होऊ शकत नाही, याची जाणीव असलेल्या या गावानं अतिशय जड अंतकरणानं त्यांना वाजत, गाजत सन्मानपूर्वक निरोप देत आपली कृतज्ञता व्यक्त केली. यामुळं भारतीय संस्कृतीत असलेलं गुरुचं, शिक्षकाचं महत्त्व आणि माणुसकीच्या नात्याची महती सगळ्यांसमोर आली आहे.

First published:

Tags: Andhra pradesh, Education, Teacher