नवी दिल्ली, 13 मार्च : भारतीय जनता पार्टीचे बंडखोर नेते आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न यांनी पुन्हा एकदा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. ''कोणत्या राजकीय पक्षामध्ये जाणार याबाबतची घोषणा 22 मार्चला करणार'', असे विधान शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी (12 मार्च)केले आहे.
तसेच, ज्या लोकसभा मतदार संघातून दोन वेळा विजय झाला आहे, त्याच जागेवरून निवडूक लढवणार असल्याचंही सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा हे बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते आग्रही आहेत. यंदा या ठिकाणी 19 मे 2019 ला मतदान होणार आहे.
प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ''बस थोडीशी प्रतीक्षा करा. अंदाज बांधण्याची गरज नाही. कोणत्या पक्षात जाणार याचे चित्र 22 मार्चला स्पष्ट होईल. पाटणा साहिब मतदारसंघातूनच लोकसभा निवडणूक लढवणार, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे''.
याआधी गुरुवारी शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची भेट घेतली होती. 'कौटुंबिक संबंध असल्याने राबडी देवी, तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती', या भेटीनंतर सिन्हा यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.
राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? असा प्रश्नही यावेळेस सिन्हा यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, भाजपपासून माझे मार्ग लवकरच वेगळे होणार आहेत. मी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लवकरच मी योग्य तो निर्णय घेईल. अशा शब्दांत सिन्हा यांनी पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
दरम्यान, गेल्या तीन-चार वर्षांपासून सिन्हा यांनी भाजपविरोधात उघड बंड पुकारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी वारंवार भाजपवर टीका आणि नाराजीही व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहेत. परंतु, शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील 'कोणत्याही परिस्थितीत पाटणा साहिब मतदारसंघातूनच लढणार आहे,' असा निर्धार व्यक्त केला आहे.
वाचा अन्य बातम्या :
सुजय विखे मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट
VIDEO : मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल-प्रियांकांचा भाजपवर हल्लाबोल