लालूंच्या कुटुंबात 'यादवी', तेजप्रताप यांचा नवा मोर्चा

लालूंच्या कुटुंबात 'यादवी', तेजप्रताप यांचा नवा मोर्चा

तेजप्रताप यादव यांच्यामुळे आधीच लालूप्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत आलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर आरोप करून तिच्याशी घटस्फोट घेण्याचा दावा दाखल केला आहे.

  • Share this:

पाटणा 1 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले असताना बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलात फुट पडली आहे. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने नव्या पक्षाची घोषणा केलीय. तेजप्रताप यांच्या या नव्या घोषणेमुळे बिहारमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.

गेले वर्षभर नाराज असलेले जेतप्रताप यादव यांनी निवडणुकीच्या तोंडावर नव्या आघाडीची घोषणा केली. 'लालू-राबडी मोर्चा'स्थापन केल्याची घोषणा केली. हा मोर्चा बिहारमध्ये 23 जागा लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

निवडणूक जिंकूनच नंतर लालू आणि राबडीदेवींचा आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राजदमध्ये आपलं कुणीही ऐकत नाही. मी फक्त दोन जागा मागितल्या होत्या मात्र त्याही देण्यात आल्या नाहीत अशी खंतही तेजप्रताप यांनी व्यक्त केली. आपला छोटा भाऊ तेजस्वी हा खुशमस्कऱ्यांनी वेढला आहे अशी टीकाही त्यांनी केली.

पत्नीशी घटस्फोट

तेजप्रताप यादव यांच्यामुळे आधीच लालूप्रसाद यादव यांचं कुटुंब अडचणीत आलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीवर आरोप करून तिच्याशी घटस्फोट घेण्याचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियातून ते वारंवार वेगवेगळी वक्तव्य करत असतात. एकीकडे घटस्फोटाचा दावा करायचा आणि दुसरीकडे, मी राधेच्या शोधात आहे, असं म्हणायचं यामुळे ते वादात सापडले होते.

गाय आणि वासरु

याआधी, तेजप्रताप यादव यांनी शंकराचं आणि कृष्णाचं रूप घेतल्यामुळेही ते चांगलेच चर्चेत होते. त्यांनी मथुरेचा दौरा करून कान्हाचं रूप धारण केलं होतं. गायींच्या मध्ये उभं राहून बासरी वाजवतानाचा त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेजप्रताप यादव यांनी कुरुक्षेत्राचाही दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याचीही जोरदार चर्चा झाली.

तेजप्रताप यादव आता पुन्हा निवडणुकांच्या कुरुक्षेत्रात उतरले आहेत. आपल्या दोन उमेदवारांची नावं घोषित करून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये दबावाचं राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलामध्ये जोरदार यादवी माजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:24 PM IST

ताज्या बातम्या