आई वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांची खैर नाही, जावं लागणार तुरुंगात

आई वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांची खैर नाही, जावं लागणार तुरुंगात

'पालकांची सेवा करा हे सांगणं हे कायद्याचं काम नाही. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे.'

  • Share this:

पाटणा 12 जून : ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना रक्ताचं पाणी करून वाढवलं त्या पालकांचा मुलं मोठी झाल्यावर सांभाळ करत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांचा हा प्रश्न देशाचा सामाजिक प्रश्न झालाय. ज्येष्ठांच्या अशा अनेक कहाण्या ह्रदयाला पाझर फोडणाऱ्या पुढं आल्या आहेत. ही सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन बिहार सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.  आई-वडिलांची सेवा न करणाऱ्या मुला-मुलींना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा प्रकारचं विधेयक मंजूर केलंय. या विधेयकानुसार पालकांची सेवा करणं हे मुलगा आणि मुलीसाठी सक्तिचं करण्यात आलंय. पालकांनी जर मुलं सांभाळ करत नाहीत अशी तक्रार केली तर मुलांना तुरुंगात जावं लागणार आहे.

पालकांची सेवा करा हे सांगणं हे कायद्याचं काम नाही. ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मात्र याबाबतील अनेक घटना पुढे आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं बिहार सरकारने म्हटलं आहे. राज्य सरकार आता विधानसभेत हे विधेयक मांडणार असून त्याला मंजूरी मिळाली की त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे.

बिहार सरकारच्या या निर्णयाचं सर्वच विरोधी पक्षांनी स्वागत केलंय. सहसा विरोधीपक्ष सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताहेत अशा घटना फारशा दिसून येत नाही. मात्र सामाजिक बदल घडविण्याची ताकद असणाऱ्या या निर्णयाचं सर्वाच पक्षांनी स्वागत केलंय. पण याची अंमलबजावणी नेमकी करणार कशी याची सरकारने ठोस योजना तयार करावी असा सल्लाही विरोधी पक्षांनी नितीश कुमार सरकारला दिला आहे.

First published: June 12, 2019, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading