आदित्य आनंद, पटना, 23 जून : बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिहार राज्यात जवळपास 7800 इतकी कोरोनाबाधितांची संख्या आहे. बिहारची राजधानी असणारे पटना शहर देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. पटनामधील पालीगंज भागामध्ये तर कोरोनाचा टाइम बॉम्ब फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालीगंजमध्ये एकाचवेळी 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरामध्ये दहशत पसरली आहे. हे सर्वांनी पालीगंजमधील डीहपाली या गावामध्ये एका लग्नसोहळ्यास 15 जून रोजी हजेरी लावली होती.
ज्या लग्नामध्ये या 15 जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील नवऱ्याचा मृत्यू लग्नानंतर दोन दिवसांनी म्हणजेच मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जूनला झाला होता. त्याचा मृत्यू देखील कोरोनामुळे झाल्याचे गावातील लोक सांगतात. मात्र अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही आहे.
(हे वाचा-ALERT! हॅकर्सनी शोधला नवा मार्ग, कोणतीही वेबसाइट उघडल्यास फोन हॅक होण्याचा धोका)
या इसमाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांचे स्वॅब सँपल चाचणीसाठी अद्याप नेण्यात आले नाही आहे. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आणि त्यांनी लग्नाशी संबधित 125 लोकांच्या सँपल चाचणीसाठी पाठवले आहे. त्याचप्रमाणे हा परिसर देखील सील करण्यात आला आहे. सध्या कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना मसौढी याठिकाणी आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डीहपाली या गावामध्ये एका तरुणाचे 15 जून रोजी लग्न झाले. सांगण्यात येत आहे की हा तरुण काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आला होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा बिहारमधील क्वारंटाइन सेंटर्स बंद झाले होते. त्यामुळे त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पोटदुखीच्या कारणामुळे त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्याला पटना याठिकाणी पाठवण्यात आले, यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
(हे वाचा-'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट)
यानंतर प्रखंड विकास पदाधिकारी चिरंजीवी पांडेय यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 125 लोकांचे स्वॅब सँपल घेण्यात आले. यापैकी 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रशासकीय सूत्रांच्या आधारे पालीगंजमधील भाजी विक्रेत्यांचे देखील स्वॅब सँपल घेण्यात आले आहे. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरी सुद्धा परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.