नवी दिल्ली 19 जून : अभिनेते आणि गुरुदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची जी मर्यादा घालून दिली होती. त्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा ठापका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आयोगाने देओल यांना नोटील पाठवली असून स्पष्टीकरण मागितलं आहे. यात ते दोषी आढळले तर त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. सनी देओल यांच्याकडून काय उत्तर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा 70 लाख एवढी घालून दिलीय. देओल यांच्या खर्चाचा जो अहवाल आयोगाला मिळाला त्यात त्यांचा खर्च हा 86 लाखांपेक्षा जास्त झाला असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे कारवाई करण्याआधी आयोगाने देओल यांना स्पष्टीकरण मागितलंय.
तर आयोगाला जो अहवाल मिळाला आहे, तो चुकीचा असल्याचं देओल यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. लवकरच खर्चाचा नवा अहवाल सादर करू असं सांगण्यात आलंय. देओल यांनी खर्च जास्त केल्याचं आढळून आलं तर आयोग त्यांचं सदस्यत्व रद्द करू शकतं आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करू शकतं असा अधिकार आयोगाला आहे.
पंजाबमधल्या गुरदासपुरमधून सनी देओल यांनी निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांचा त्यांनी पराभव केला होता. जाखड यांनी 63 लाख रुपये खर्च झाल्याचं दाखवलंय. तर आप चे उमेदवार पीटर मसीह यांचा खर्च फक्त 7 लाख 65 हजार रुपये एवढा झालाय असं आयोगाला सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lok Sabha election, Sunny deol