मुंबई, 17 ऑगस्ट : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अध्वर्यूंपैकी एक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं न्यूजर्सी (Pt. Jasraj passes away in USA) इथे निधन झालं. 90 वा वाढदिवस झाल्यानंतरही अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. अमेरिकेतल्या शिष्यांना भारतीय संगीताचे धडे देण्याचं काम सुरू होतं आणि आधुनिक डिजिटल पद्धतीने ते ऑनलाईन धडे देत होते. OTT प्लॅटफॉर्मवर रीलिज झालेल्या बंदिश बँडिट्स (Bandish Bandits) या चित्रपटाला शुभेच्छा देणारा त्यांचा VIDEO आता शेअर होत आहे. हाच VIDEO पंडितजींचा अखेरचा व्हिडीओ ठरला.
बंदिश बँडिट्स हा चित्रपट नुकताच Amazon Prime वर रीलिज झाला आहे. या चित्रपटातल्या कलाकारांना आणि संगीताला त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत 'जय हो' म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या.
गायनानंतर दोन्ही हात उंचावर श्रोत्यांना अभिवादन करून जय हो म्हणायची त्यांची पद्धत त्यांच्या मैफलींना हजेरी लावलेल्या चाहत्यांच्या परिचयाची आहे. त्याच शैलीत त्यांनी बंदिश बँडिटच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
शास्त्रीय संगीत आणि पॉप म्युझिक यांच्या अनोख्या जुगलबंदीत अडकलेली प्रेमकहाणी या चित्रपटातून दिसते. नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी आदींच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
हरियाणात जन्मलेल्या जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा मराठी आहेत. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी 1962 मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत.
भारताबरोबरच जगभरात पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. अमेरिका आणि कॅनडातही अनेक वर्षं त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे कित्येकांना दिले.
पंडित जसराज यांचे वडील मोतीराम हेसुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी योगदान दिले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.