पाककडून मिसाईलचा मारा, भारताने दिलं चोख प्रत्युत्तर : सीमेजवळ पाकिस्तानची आगळीक सुरूच

पाककडून मिसाईलचा मारा, भारताने दिलं चोख प्रत्युत्तर : सीमेजवळ पाकिस्तानची आगळीक सुरूच

पाकिस्तानने बुधवारी सकाळी भारतीय लष्करी तळांवर लेसर गायडेड मिसाईल्सचा मारा केला. पण त्यांचा नेम थोडक्यात चुकला. भारताने हा हल्ला परतवून लावला आहे आणि पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : एकीकडे भारत- पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावावर चर्चा होऊ शकते असं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराची सीमेजवळ आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा नव्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय लष्कर याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

सरकारी सूत्रांनी न्यूज18ला दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूकडून 20 लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत दिसली. 10 किलोमीटरपर्यंत ती भारतीय हद्दीतही आली. त्यांनी लेसर गायडेड मिसाईल्सचा मारा करून भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा नेम थोडक्यात चुकला.

भारतीय लष्कराने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत विमानांना परतवलं.पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेजवळच्या गावातला एक नागरिक जखमी झाला आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या पायलटची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारताने लावून धरली आहे. याबाबत कुठलीही तडजोड किंवा चर्चा भारत करू इच्छित नाही. द्विपक्षीय करारानुसार तातडीने त्यांना सोडावं, असं भारतान ठामपणे सांगितलं आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

संबंधित बातमी

भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे संकेत

पाकिस्तानला मोठा धक्का; OICचं भारताला आमंत्रण

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 'भारतीय वैमानिकाची सुटका करण्याबाबत भारतासोबत खुल्या दिलानं तडजोड करायला तयार आहे,' असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

'भारतीय वैमानिक आमच्याकडे सुरक्षित आहे. पाकिस्तानी लष्कर एक जबाबदार लष्कर असून आम्ही लष्करी संकेतांचा आदर करतो,' असं शाह मेहमूद यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी याआधी केलं होतं. पाकिस्तानने अभिनंदन वर्तमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

First published: February 28, 2019, 3:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading