पाकिस्तानचा डाव उधळला, ‘ड्रोन’मधून दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा; 3 जणांना अटक

पाकिस्तानचा डाव उधळला, ‘ड्रोन’मधून दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा; 3 जणांना अटक

पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती.

  • Share this:

श्रीनगर 18 सप्टेंबर: काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करतो ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले ते रहिवासी असून राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस अशी त्यांची नावे आहेत.

जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात 2 एके-56 रायफल्स, 180 राउंड, 6 एके-मॅगझीन्स, दोन चिनी पिस्तुल, 30 राउंडसोबतच तीन पिस्तुल मॅगझीन्स आणि चार ग्रेनेड एवढा शस्त्रसाठा आहे. त्याच्यासोबतच 1 लाख रुपये रोखही जप्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध धडक मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने चकमकी घडत आहेत. हिवाळ्याच्या आधी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसविण्याचाही पाकिस्तानचा डाव आहे. सुरक्षा दलांना नुकताच पाकिस्तानने सीमेवर खोदलेला एक बोगदाही आढळला होता. चिनी इंजिनिअर्सच्या मदतीने हा बोगदा खणण्यात आल्याचं उघड झालं होतं.

दहशतवाद्यांना भारतात पाठविण्यासाठी आणि त्यांना पुन्हा परत पळून जाण्यासाठी या बोगद्याचा उपयोग करण्याचा डाव उघडकीस आला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 19, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading