S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'मसूद अझहर जिवंत', पाक लष्करानं बदललं त्याचं ठिकाण

पाकिस्तानी लष्कराने मसूद अझहरला 'या' ठिकाणी हलवलं

Updated On: Mar 4, 2019 12:12 PM IST

'मसूद अझहर जिवंत', पाक लष्करानं बदललं त्याचं ठिकाण

नवी दिल्ली, 4 मार्च : 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहर जिवंत असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानी लष्कराने रविवारी(3मार्च) संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मसूद अझहरला रावळपिंडीतील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील 'जैश-ए-मोहम्मद'च्या तळावर हलवले, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. मसूद अझहरला किडनीचा आजार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर पाकिस्तानच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी सीएनएनसोबत बातचित करताना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच असल्याची कबुली दिली होती. मसूद अझहर आजारी असून त्याला घराबाहेर पडणं शक्य होत नसल्याची माहिती कुरेशींनी दिली होती.



दुसरीकडे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, 'जैश-ए-मोहम्मद'सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला नावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावास पाकिस्तान समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'मध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.

मसूद अजहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी

मसूद अजहरचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला. बुधवारी अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला. जैश-ए-मोहम्मद या संघटनेनेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला, असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे. मसूज अजहरवर शस्त्रबंदीसह आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीही करावी तसंच त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी विनंती अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने या प्रस्तावाद्वारे केली होती.

यासंबंधी एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'ने वृत्त दिले आहे की, पाकिस्तानकडून एका निर्णायक धोरणा अंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटना आणि 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. अझहरविरोधात काय कारवाई करण्यात येईल?, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावास केलेला आपला विरोध पाकिस्तान मागे घेण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट संकेतही अधिकाऱ्यानं दिले आहेत. 'केवळ एक व्यक्ती महत्त्वाची आहे की व्यापक राष्ट्रीय हित महत्त्वाचे आहे?, यावर देशाला ठोस निर्णय घ्यावा लागले',अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यानं दिली आहे.

कोण आहे मसूद अझहर?

संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झाला. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. संघटनेने जारी केलेल्या एका व्हिडीओनुसार आदिल अहमद उर्फ वकास कमांडोने हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. आदिल पुलवामा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.


कंदहार विमान अपहरणानंतर जैश-ए-मोहम्मदला बळ

सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्या आयईडीने उड़वून देणाऱ्या या संघटनेचा हा पहिलाच हल्ला नाही. 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.


मसूद अझहरच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण

भारतातील तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद या दहशतवादी आणि म्होरक्यांच्या सुटकेची मागणी करत विमानाचे अपहरण केलं होतं. अपहृत विमानात 168 प्रवासी होते. त्यांच्यासह विमान कंदहारला नेण्यात आलं होतं. शेवटी सहा दिवसांनी देशभरातून दबाव वाढू लागल्याने तत्कालिन भाजप सरकारने तिघांना तुरुंगातून मोकळं करत ओलीस ठेवण्यात आलेल्यांची भारतीय नागरिकांची सुटका करुन घेतली होती.

भारतात दहशतवादी हल्ले

2000 मध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि मसूद अजहरने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. यावेळी इतर काही संघटनामधील दहशतवादी जैशमध्ये सहभागी झाले. स्थापनेनंतर दोन महिन्यात जैश-ए-मोहम्मदने श्रीनगरमधील बदामीबाग येथे लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला केला होता. त्यानंतर लगेच जम्मू काश्मीरमधील सचिवालयाच्या इमारतीवर हल्ला केला होता.

पुलवामाप्रमाणेच श्रीनगरमध्ये हल्ला

ज्याप्रमाणे पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या गाडीला धडकवली त्याच पद्धतीने 24 सप्टेंबर 2001 ला श्रीनगरमध्ये विधानसभा भवनात गाडी घुसवली होती. यात 38 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

संसदेवर आणि पठाणकोट हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद?

भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 ला झालेला हल्ला आणि दोन वर्षांपूर्वी 2016 ला पठाणकोट येथे हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटनाच जबाबदार असल्याचे म्हटले जाते. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू हा जैश संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी होता. त्याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली. उरी येथे 2016 मध्ये भारताच्या लष्करी ठाण्यांवर झालेल्या हल्ल्याला जैशला जबाबदार धरलं जातं. या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.


भारतासह संयुक्त राष्ट्रसंघानेही घातली आहे बंदी

जैश ए मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघानेही दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलं आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने 2002 मध्ये त्यांच्यावर बंदी घातली होती. मात्र तरीही संघटनेचा प्रमुख मसूद अजहर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहत असल्याचंही बोललं जातं. अजहर मसूदचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारताने अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. पण सबळ पुरावे नसल्याचे कारण देत पाकिस्तानने मसूदच्या प्रत्यार्पणाला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close