पाकिस्तान पडला एकटा : 'जैश'सह इतर दहशतवादी संघटनांवर आता कारवाई करावीच लागणार

पाकिस्तान पडला एकटा : 'जैश'सह इतर दहशतवादी संघटनांवर आता कारवाई करावीच लागणार

FATF या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वित्तपुरवठा करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 2018 मध्ये पाकिस्तानात 8707 संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : दहशतवादाला पायबंद घालण्याच्या उद्देशाने आणि जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या Financial Action Task Force (FATF)या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वित्तपुरवठा करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 2018 मध्ये पाकिस्तानात 8707 संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा अहवाल समोर आला आहे. 2017 च्या तुलनेत अशा संशयास्पद व्यवहारांचं प्रमाण 57 टक्क्यांनी वाढलं आहे. त्यामुळे आता हे आर्थिक व्यवहार कुणी केले आणि कशासाठी झाले याचं स्पष्टीकरण पाक सरकारला द्यावं लागणार आहे. या आकडेवारीचे दाखले पाकिस्तानी माध्यमातूनच आले आहेत. दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही, तर त्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, अशी चिन्हं आहेत.

पुलावामा हल्ल्यानंतर या पॅरिस स्थित संस्थेने पाकिस्तान सरकारला वेळीच दहशतवादाला आवर घालण्याचा इशारा दिला होता. आता यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असून 27 टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी पाक सरकारने 10 कलमी अॅक्शन प्लॅन केला असल्याचं पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याविषयी पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला आहे आणि पाक सरकारला कुठल्याही परिस्थितीत प्राधान्याने हे टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये घडवलेला हल्ला मोठ्या आर्थिक मदतीशिवाय घडवणं शक्य नाही, असं सांगत Financial Action Task Force (FATF) या दहशतवाद आणि जागतिक शांततेवर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानवर ताशेरे ओढले होते. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत कुठून मिळते याविषयी पाकिस्तानने काहीच चौकशी कशी केली नाही. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनांना कोण पोसतंय याची माहिती पुरवण्यात पाकिस्तानला यश आलेलं नाही, हा चिंतेचा विषय आहे, असं FATF या संस्थेनं म्हटलं होतं.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकावं यासाठी FATF वर भारताकडून दबाव आणला जात होता. या संस्थेनं पाकिस्तानला आधीच ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. आता पुढची पायरी म्हणजे ब्लॅक लिस्ट करणं.

पुलवामा हल्ल्यात भारताच्या CRPF चे 40 जवान मृत्युमुखी पडल्याच्या घटनेनंतर FATF या पॅरिस स्थित आंतरराष्ट्रीय संघटनेनं 38 सदस्यांची बैठक घेऊन एक निवेदन जारी केलं. त्यातून पाकिस्तानला दहशतवादाला आळा घालण्याचा इशारा देण्यात आला. "दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या नाड्या आवळणं आवश्यक आहे. दहशतवाद संघटनांना फंडिंग कुठून होतं याची शहानिशा पाकिस्ताननं करणं आवश्यक आहे", अशा अर्थाचं हे निवेदन होतं.

ग्रे यादीत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्थांकडून कर्ज मिळण्यात आणखी अडचणी येतील. ब्लॅक लिस्टमध्ये देश गेला की कर्जपुरवठ्याचा आंतरराष्ट्रीय ओघ पूर्ण आटतो आणि आर्थिक नाड्या आवळल्या जातात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था (IMF)देखील कुठला आर्थिक आधार देण्यास असमर्थता व्यक्त करते.

First published: March 4, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading