श्रीनगर, 15 नोव्हेंबर : पाकिस्तानकडून (Pakistani Army) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. यात मोठी जीवितहानी झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेज आणि उरी सेक्टरदरम्यान, नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, ज्यात पाच सुरक्षारक्षकांसह 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय सेनेनेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सेनेने केलेल्या कारवाईत पाकिस्तानलाही मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सेनेतील चार जवान आणि सीमा सुरक्षादलातील एक जवान शहीद झाले आहेत. तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बीएसएफचे महानिरिक्षक राजेश मिश्रा यांनी सांगितलं की, पाकिस्तानने गोळीबार केला, त्याला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या अनेक सुरक्षा चौक्या उद्धस्त करण्यात आल्या आहेत.
भारतीय सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आतापर्यंतच्या कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 11 सैनिकांना कंठस्नान घातलं असून 12 सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. तर त्याच सोबत पाकिस्तानशी लढताना सब इन्स्पेक्टर राकेश डोवाल यांना वीरमरण आलं आहे.
ऐन दिवाळीत, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताच्या भागात मोठं नुकसान झालं आहे. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी नियंत्रण, रेषेजवळ 250-300 दहशतवादी तयार होते. मात्र, सुरक्षा दलाला त्यांचा हेतू असफल करण्यात यश आलं, असल्याची माहिती बीएसएफचे उपनिरिक्षक राकेश डोभाल यांनी दिली.