इस्लामाबाद, 07 एप्रिल : पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेला एअर स्ट्राईक यावरून भारत - पाकिस्तानमधील संबंधांमध्ये अजूनही तणाव आहे. सीमेवर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. शिवाय, दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, या साऱ्या घडामोडी घडत असताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी भारताकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. 'भारत पुन्हा एकदा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. 16 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात केव्हाही हल्ला होऊ शकतो,' असा कांगावा शाह मेहमुद कुरेशी यांनी केला आहे.
14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं भारतीय लष्कराच्या तुकडीला लक्ष्य केलं. यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुदलानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. त्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
पाकच्या कुरापती
एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या एफ-16 विमानांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय वायु दलानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान देखील भारतानं पाडलं. त्यावरून पाकिस्ताननं भारतीय लष्करांच्या तळावर क्षेपणास्त्र डागलं होतं. त्याचे पुरावे एकत्र करत भारतानं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तनच्या मुसक्या आवळायला सुरू केली. त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावलं. तसेच पाकिस्तानचं पाणी देखील रोखलं गेलं. पण, त्यानंतर देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तानवर हल्ला करेल असा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. पण, भारताकडून त्याला अद्याप काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही.
VIDEO: तावडेंची हिम्मत असेल तर...मनसे नेत्याचं खुल्लं चॅलेंज