VIDEO शबरीमला नंतर केरळमध्ये आता एका हत्तीवरून वाद

VIDEO शबरीमला नंतर केरळमध्ये आता एका हत्तीवरून  वाद

महाराष्ट्रात बैलगाडीवर बंदी, तामिळनाडूत जलीकट्टूवर बंदी आणि आता केरळमध्ये हत्तीवर बंदी घातल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 09 मे : केरळमध्ये प्रसिद्ध शबरीमला देवस्थानात महिलांना प्रवेशाची न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्रचंड वाद झाला होता. त्याचे पडसाद देशभर उमटले होते. हा वाद शांत होत नाही तोच तिथे एका देखण्या हत्तीवरून नव्या वादाला सुरूवात झालीय. 54 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या या हत्तीला जत्रेत सहभागी होण्यास बंदी घातल्याने राज्यात नवं वादळ निर्माण झालंय.

केरळमधलं त्रिशूर हे धार्मिक सोहळ्यात हत्तींच्या सहभागाबद्दल जगप्रसिद्ध आहे. हा सोहळा पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर सर्व जगातून पर्यटक त्रिशूरला येत असतात. त्रिशूरला होणाऱ्या 'पूरम'मध्ये दरवर्षी 100 पेक्षा जास्त हत्ती सहभागी होतात. महाराष्ट्रात जसं देव-देवतांच्या यात्रा भरतात तसं केरळमधल्या यात्रांना 'पूरम' असं म्हटलं जातं.

या यात्रेत सगळ्यांचं आकर्षण असतं ते त्रिशूरच्या सर्वात मोठ्या मंदिराच्या हत्तीचं. तेच्चिकोट्टूकावू रामचंद्रन असं या हत्तीचं नाव आहे. उंची 11 फूट आणि वय 54 पेक्षा जास्त वर्ष. आशिया खंडात हा सर्वात मोठा हत्ती असल्याचं समजलं जातं. एका डोळ्याने या हत्तीला दिसत नाही. मात्र त्याचा मान सर्वात जास्त आहे. गेली अनेक दशकं तो या धार्मिक सोहोळ्यात सहभागी होत असल्याने हा हत्ती देवाचा मानाचा हत्ती समजला जातो.

फेबु्वारी महिन्यात हा हत्ती बिथरल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून यात्रेत या हत्तीच्या सहभागावर बंदी घातलीय. त्याच्या विरोधात आता अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. ही बंदी म्हणजे हिंदूंच्या सणांवर आक्रमण असल्याचा आरोप होतोय. कायद्याचा बडगा दाखवून सर्वच सणांवर बंदी लादली जात असल्याच आरोपही केला जातो.

मात्र केवळ सुरक्षेचा उपाय म्हणून बंदी घातली असल्याचं प्रशासनाने सांगितलंय. या यात्रेत शेकडो लोक सहभागी होतात त्यामुळे केवळ खबरदारी म्हणून ही बंदी घातली असं प्रशासनाचं म्हणणं आहे. रामचंद्रनला जर सहभागाची परवानगी दिली नाही तर धार्मिक सोहोळ्यात कुठलाही हत्ती सहभागी होणार नाही असा इशारा  हत्तींचे मालक असलेल्या संघटनेने दिला आहे. त्यामुळे   सरकारची चिंता वाढली आहे.

First published: May 9, 2019, 11:40 PM IST
Tags: keral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading