वाराणसीच्या गोवर्धन परिसरात सध्या पंजाबसारखं दृश्य पाहायला मिळत आहे. तिथे संत रविदासांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमीला केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक येत आहेत. संत रविदासांच्या जन्मस्थानी व्हीव्हीआयपी व्यक्तीदेखील सामान्य भक्तांप्रमाणे सेवा करतात. न्यूयॉर्कचे हरेंद्र पॉल हेही त्यापैकीच एक. हरेंद्र हे न्यूयॉर्कमधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत. परंतु ते येथे संत रविदास यांच्या जन्मस्थानी साफसफाईचं काम करण्यासोबतच लंगरमध्ये प्रसाद बनवण्याचं काम करत आहेत.
हरेंद्र हे मूळचे पंजाबमधल्या जालंधरचे आहेत. सध्या ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात स्वतःची बांधकाम कंपनी चालवतात. हरेंद्र यांनी सांगितलं की, ‘मी 26 जानेवारीला येथे आलोय. संत रविदासांच्या या जन्मस्थानी लंगर प्रसाद तयार करण्याबरोबरच स्वच्छता आणि इतर कामातही मी मदत करतोय.’
गेल्या 15 वर्षांपासून दर वर्षी हरेंद्र त्यांच्या कुटुंबासह येथे येतात. यंदा त्यांच्यासोबत त्यांचे वडील महेंद्र आणि भाऊ आला आहे. हरेंद्र यांनी सांगितलं की, ‘मी 9 फेब्रुवारीपर्यंत येथे राहणार असून, गुरूंच्या पवित्र अशा या जन्मस्थळी सेवा करणार आहे.’ दुसरीकडे, हरेंद्र यांची मंदिराप्रती असलेली खरी भक्ती पाहून मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींनी त्यांना संत रविदास मंदिराचे प्रमुख संत निरंजन दास यांच्या लंगर प्रसादाच्या ठिकाणी काम दिलं आहे.
मंदिरातल्या सेवेदरम्यान हरेंद्र सर्व व्हीव्हीआयपी सुविधा सोडून सामान्य माणसाप्रमाणे जगतात. ते हॉटेलमध्ये नाही, तर तिथे बांधलेल्या तंबूत रात्र काढतात.
हरेंद्र यांच्यासारखे अनेक व्हीआयपी भक्त येथे येतात; पण ते सर्वजण अगदी सर्वसामान्यांप्रमाणे येथे वावरताना दिसतात. ते लोकांच्या सेवेत मग्न असतात. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी संत रविदासांच्या जन्मस्थानी 6 हजारांहून अधिक सेवेकरी विविध प्रकारच्या सेवा देत आहेत.
देवासमोर किंवा गुरूच्या चरणी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव अजिबात केला जात नाही. देवासमोर सर्व जण समान असल्याचं समजलं जातं. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळी व्हीव्हीआयपी व्यक्तीही अगदी सर्वसामान्यांसारखे वावरताना दिसतात. बऱ्याच श्रीमंत व्यक्ती धार्मिक स्थळी सर्वसामान्य भक्तांची सेवा करतात. सध्या असंच वातावरण संत रविदासांच्या जन्मभूमीवर दिसत आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असून त्यांची सेवा करण्यात अनेक जण गुंतलेले आहेत. यामध्ये व्हीव्हीआयपी व्यक्तींचाही समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.