नवी दिल्ली, 10 एप्रिल : देशातल्या 700 कलाकार आणि बुद्धीवंतांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर आता विविध क्षेत्रातील सुमारे 900 मान्यवर मोदींच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. मोदी विरोधातल्या विचारवतांची एकत्र येण्याचे कारण विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं सांगितलं होतं. तर भ्रष्टाचार मुक्त आणि विकासाभिमूख प्रशासन हे मोदी समर्थक विचारवंतांचे मुद्दे आहेत.
जगात भारताची प्रतिमा उंचावणं आणि दहशतवादाला चोख प्रत्योत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झाले पाहीजेत असं आवाहन या मान्यवरांनी केलं आहे. या मान्यवरांमध्ये गायक पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ, शिल्पकार राम सुतार, दलित लेखक अर्जुन डांगळे, पं. विश्व मोहन भट्ट, नाट्यकर्मी वामन केंद्रे, नृत्यांगना संध्या पुरेचा, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
एक संयुक्त पत्रक काढून या मान्यवरांनी मजबूत आणि विकसित देशासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. देशाला मजबूर नाही तर मजबूत सरकार पाहिजे असं या पत्रकात म्हटलं आहे. या आधी सातशे मान्यवरांनी पत्रक काढून मोदींविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यात गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शहा, शबाना आझमी, गणेश देवी, महेश एलकुंचवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात झालेल्या प्रचार सभेत पुन्हा एकदा काँग्रेस आणि गांधी घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षातला एक परिवार हा कायम दलाली करतो असा आरोप त्यांनी गांधी घराण्याचं नाव न घेता केला. गोव्यात झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या या दलालीमुळेच सैन्याची शक्ती कमी झाली. ऑगस्टावेस्टलँड प्रकरणातला आरोपी मिशेल याला पळून जाण्यात काँग्रेसनेच मदत केली होती. त्यांना माहित नव्हतं की मोदी सत्तेत आल्यावर त्याला परत आणणार. पण आता तो अनेक खुलासे करत आहे असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही आठवण केली. मोदी म्हणाले, पर्रिकरांचं सरकार घालविण्यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. काँग्रेस हा सत्तेसाठी हपापलेली आहे. पर्रिकरांचं अपूर्ण स्वप्न नवं सरकार पूर्ण करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.