निवडणुकीसाठी असे जमवा पैसे; स्टार्ट-अपच्या माध्यमातून 'या' 12 उमेदवारांनी मिळवले 90 लाख

निवडणुकीसाठी असे जमवा पैसे; स्टार्ट-अपच्या माध्यमातून 'या' 12 उमेदवारांनी मिळवले 90 लाख

अवर डेमोक्रसी नावाच्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून 12 उमेदवारांसाठी निवडणूक निधी उभा करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातले हे 2 उमेदवार आहेत.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : निवडणुकीसाठी उभं राहायचं तर भरपूर पैसे लागतात, ही बाब तर जगजाहीर आहे. पक्षाचा पाठिंबा असेल नसेल तरीही निवडणुकीसाठी पैसे जमा करताना भल्याभल्यांची दमछाक होते. आता हे काम सोपं करण्याचा मार्ग सांगणारा एक स्टार्ट अप सुरू झाला आहे. कन्हैय्या कुमार यांना यातून सर्वाधिक निधी मिळाला आहे. अवर डेमोक्रसी नावाच्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून 12 उमेदवारांसाठी निवडणूक निधी उभा करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातले हे 2 उमेदवार आहेत.

क्राउड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवण्याची पद्धत या स्टार्टअपने उपलब्ध करून दिली आहे. बेगुसराईहून उभे राहिलेल्या कन्हैय्या कुमार यांना यातून आत्तापर्यंत 51 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांनी 45 लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत या स्टार्टअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या उमेदवारांसाठी तब्बल 90 लाखांचा निधी उभा राहिला आहे.

आनंद मंगनाळे यांनी सुरू केलेल्या अवर डेमोक्रसी नावाच्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून 12 उमेदवारांसाठी निवडणूक निधी उभा करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातले 2 उमेदवार आहेत. यामध्ये नागपूरहून नितीन गडकरींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून उभे राहिलेले नाना पटोलेही असल्याचं समजतं. शिवाय यवतमाळ वाशिम मतदारसंघातून प्रहार पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या वैशाली येडे यासुद्धा क्राउड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा करत आहेत. शेतकरी पतीने आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रिंगणात उतरलेल्या वैशाली पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या त्यांच्या भाषणानंतर. आता लोकसभेसाठी त्या उभ्या आहेत.

काय आहे हा स्टार्टअप

आनंद मंगनाळे यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी हा नवा उद्योग सुरू केला. निवडणुकीसाठी फंड जमा करण्याचं वैध माध्यम देण्याचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा दावा आहे. जेवढा निधी जमतो त्याच्या 5 टक्के रक्कम अवर डेमोक्रसीला मिळते. उमेदवाराच्या निधी संकलनासाठी ते व्हिडिओ आणि इतर प्रसिद्धी साधनं उपलब्ध करून देतात. ज्यांना उमेदवाराला निधी द्यायचा असेल त्यांनी बँक अकाउंटमध्ये जमा करावा, असं आवाहन करण्यात येत आहे. 20000 पेक्षा जास्त रक्कम दान करत असतील त्यांनी पॅन कार्डसुद्धा सादर करणं अनिवार्य आहे, असं आनंद सांगतात. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी उमेदवार जास्तीत जास्त 70 लाख रुपयांचा निधी खर्च करू शकतो, असं बंधन घातलं आहे. अवर डेमोक्रसीनं हेच लक्ष्य प्रत्येक उमेदवारासाठी ठेवलं आहे. आता या माध्यमातून 70 लाख रुपये उभं करण्याचं आव्हान 12 उमेदवारांनी स्वीकारलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या