मुंबई, 8 डिसेंबर : सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी स्वत:च्या क्षमता सिद्ध करून दाखवल्या आहेत. तरीदेखील काही क्षेत्रांमध्ये महिलांचा अजून पाहिजे तेवढा सहभाग वाढलेला नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर विद्युत वितरण क्षेत्राचं घेता येईल. देशातल्या विद्युत वितरण विभागामध्ये अधिकारी पदांवर किंवा कार्यालयांमध्ये क्लरिकल पदांवर महिला काम करताना दिसतात. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम करणाऱ्या महिलांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी आहे.
देशातील पहिल्या लाईनवुमन्स
'लाइनमन' हा शब्द ऐकला की उंच विजेच्या खांबांवर चढून हायटेन्शन वायर्समध्ये काम करणारे पुरुष डोळ्यांसमोर येतात, पण आता आपल्याला 'लाइनवुमन'सुद्धा पाहायला मिळणार आहेत. याची सुरुवात तेलंगणामधून झाली आहे. तिथे प्रथमच दोन मुलींची 'लाइनवुमन' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 22 वर्षीय शिरीषा आणि 24 वर्षीय व्ही. भारती या दोघी देशातल्या पहिल्या 'लाइनवुमन्स' ठरल्या आहेत. दोघींनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.
लाईनमन पदासाठी अर्ज
सध्या शिरीषा हैदराबादमध्ये, तर व्ही. भारती वारंगळमध्ये तैनात आहे. दोघी ज्युनियर 'लाइनवुमन' म्हणून काम करतात. लवकरच त्यांची बढती होऊन त्या या क्षेत्रात पुढे जातील, अशी दोघींनाही आशा आहे. लाइनवुमन होण्यासाठी या दोन्ही मुलींना न्यायालयीन लढा द्यावा लागला. 2020 पूर्वी महिलादेखील लाइनवुमन म्हणून काम करू शकतात याचा विचारही कोणी केला नव्हता. आयटीआय केल्यानंतर शिरीषा आणि व्ही. भारती यांनी 'लाइनमन' पदासाठी अर्ज केला. या नोकरीसाठी मुलींनी अर्ज केल्याची ही पहिलीच घटना होती. त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. 'लाइनमन' फक्त पुरुषच असू शकतात, असं त्यांना सांगण्यात आलं.
हेही वाचा : पती-पत्नीमधील वादाने घेतला आपल्याच पार्टनरचा जीव; जाधव कुटुंब काही क्षणात उद्धवस्त
न्यायालयीन लढा
यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्या नोकरीसाठी पात्र आहेत. त्या विजेच्या खांबावर चढू शकतात, ही गोष्ट त्यांना न्यायालयासमोर सिद्ध करायची होती. दोघींनी अधिकाऱ्यांसमोर आठ फूट उंचीच्या विजेच्या खांबावर चढूनही दाखवलं. त्यानंतर न्यायालयानं या मुलींच्या बाजूनं निर्णय दिला आणि देशातल्या पहिल्या 'लाइनवुमन'ची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा : गुप्तधनासाठी 'त्या'ला जिवंत जाळलं; जादूटोण्याच्या प्रकारानं औरंगाबाद पुन्हा एकदा हादरलं
मुलींना प्रेरणा
आपला अनुभव शेअर करताना शिरीषानं स्थानिक मीडियाला सांगितलं, की आता अनेक तरुण मुली तिच्याकडे येतात. 'लाइनवुमन' होण्यासाठी माहिती विचारतात. अनेक मुलींनी आयटीआयचा अभ्यासही सुरू केला आहे. विजेच्या उंच खांबांवर किंवा हाय टेन्शनच्या तारांवर चढताना तिला भीती वाटत नाही, असं शिरीषा सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.