ऑनलाइन क्लासमध्ये राष्ट्रगीत म्हणताना उभं न राहिल्याबद्दल IIT च्या प्राध्यापिकेने विद्यार्थ्यांना केला शिवीगाळ

ऑनलाइन क्लासमध्ये राष्ट्रगीत म्हणताना उभं न राहिल्याबद्दल IIT च्या प्राध्यापिकेने विद्यार्थ्यांना केला शिवीगाळ

Online Class मध्ये विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणताना उभे राहिले नाहीत तसंच त्यांनी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली नाही, म्हणून या शिक्षिकेने आक्षेपार्ह शब्दात विद्यार्थ्यांची हेटाळणी सुरू केली, असा आरोप आहे.

  • Share this:

खरगपूर, 26 एप्रिल: आयआयटी-खरगपूरमधील (IIT -Kharagpur) एका प्राध्यापिकेनं ऑनलाइन क्लासमध्ये (Online Class) विद्यार्थी राष्ट्रगीत (National Anthem) म्हणताना उभे राहिले नाहीत तसंच त्यांनी ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली नाही, यासाठी त्यांना शिवीगाळ (Abusing) करण्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनीही शिक्षिका (Teacher) विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही शिवीगाळ करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवला आहे.

ऑनलाइन क्लासमध्ये या शिक्षकेनं राष्ट्रगीत म्हणण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उठून उभे राहण्याची सूचना केली. आपण आपल्या देशासाठी किमान एवढं तरी करू शकता आणि नसेल तर क्लास सोडून जा असं सांगितलं. यासाठी नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षिकेनं निर्लज्ज म्हटलं आणि अतिशय आक्षेपार्ह शब्दात तिनं विद्यार्थ्यांची हेटाळणी सुरू केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही दूषणं देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

ही शिक्षिका मुलांना शिव्याशाप देत 'मी तुम्हाला सतत कॉल करेन, पृथ्वीवरील कोणीतीही शक्ती मला रोखू शकत नाही’, असं म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिनं विद्यार्थ्यांना तिच्याविरुद्ध तक्रारी करण्याची हिंमत असेल तर, अल्पसंख्यक समिती किंवा शिक्षण मंत्रालयाकडे जा, असंही म्हटलं.

‘ऑनलाइन प्रीपरेटरी क्लासमध्ये (Online Preparatory Class) शिक्षिकेनं विद्यार्थ्यांशी (Students) केलेल्या या वर्तनाची दखल संचालकांनी (Director) घेतली असून, याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे', अशी माहिती आयआयटी-खरगपूर प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

दुर्बल, वंचित गटातील विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी या उद्देशानं आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशपरीक्षेची तयारी करून घेण्याकरता आयआयटीद्वारे विशेष प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. आयआयटी खरगपूरतर्फे आयोजित अशा एक वर्षाच्या पूर्वतयारी अभ्यासक्रमाच्या (Preparatory Class) ऑनलाइन वर्गात ही घटना घडली आहे.

अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आदी गटातील (SC, ST, PwD) विद्यार्थांसाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी हे वर्ग आयोजित केले जातात. या कोर्सच्या शेवटी उमेदवारांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केलं जातं. ज्या संस्थेमध्ये हा एक वर्षाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम चालविला जातो ती संस्था आणि उमेदवारासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या असू शकतात. आयआयटीमधील रिक्त राहिलेल्याअनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आदी गटातील उमेदवारांसाठीच्या राखीव जागांवर याच श्रेणीतील उमेदवारांना शिथिल करण्यात आलेल्या प्रवेश अटींच्या आधारे याएक वर्षाच्या पूर्वतयारी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.

First published: April 26, 2021, 8:45 PM IST
Tags: IIT

ताज्या बातम्या