भविष्यात आणखी वाढू शकतात कांद्याचे भाव

भविष्यात आणखी वाढू शकतात कांद्याचे भाव

सध्या बाजारात कांद्याचा भाव हा 70 ते 100 रुपये एक किलोपर्यंत गेला आहे. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये एक किलोपर्यंत जाऊ शकतो. साधारणपणे मागील दोन आठवड्यांपर्यंत सर्वसाधारण भावामध्ये कांदा विकला जात होता. पण अचानक एका दिवसातच कांद्याच्या भावामध्ये क्विंटलमागे 2 हजार रुपयांची वाढ झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : 1980 च्या दशकात जनता पार्टीची सत्ता असताना कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे त्यांना सत्ता गमवावी लागली होती. 'जिस सरकार का कीमत पर जोर नहीं, उसे देश चलाने का अधिकार नहीं', अशा घोषणा देत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार केला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालत प्रचार केला होता. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा काँगेसला सत्तेत बसवत जनता पक्षाला विरोधी पक्षात बसवले. त्यानंतर आगामी काळात देखील अनेक नेत्यांना कांद्याच्या भावाने रडवले आहे. 1998 मध्ये तर दिल्लीमध्ये कांद्याच्या दरवाढीमुळे भाजपला तीन मुख्यमंत्री बदलावे लागले होते. मदन लाल खुराना, साहिबसिंह वर्मा आणि सुषमा स्वराज या तीन मुख्यमंत्र्याना बदलल्यानंतर देखील भाजपला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

त्याचबरोबर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांनी देखील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कांद्यामुळे आमचा पराभव झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता बिहारमध्ये देखील विधानसभेच्या निवडणूक होत असून या कांद्याच्या भाववाढीचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या बाजारात कांद्याचा भाव हा 70 ते 100 रुपये एक किलोपर्यंत गेला आहे. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये एक किलोपर्यंत जाऊ शकतो. साधारणपणे मागील दोन आठवड्यांपर्यंत सर्वसाधारण भावामध्ये कांदा विकला जात होता. पण अचानक एका दिवसातच कांद्याच्या भावामध्ये क्विंटलमागे 2 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे इतर दिवशी 30 ते 40 रुपये असणारा कांदा अचानक 70 रुपये किलोने विकला जाऊ लागला आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याचा भाव हा 7100 रुपये क्विंटलवर गेला होता. त्यामुळे या ठिकाणी भाव वाढल्यास याचा फरक संपूर्ण देशातील बाजारावर आणि कांद्याच्या भावावर पडतो.

का वाढले भाव -

साधारणपणे कोणत्याही वस्तूची मागणी वाढली किंवा उत्पादन कमी झालं तर भाववाढ होते. पण कांद्याच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी झाल्या असून मागणी आणि तुटवड्यामुळे कांद्याचा भाव प्रचंड वाढला आहे. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या माहितीनुसार, कांद्याचं सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होतं. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे ,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यानंतर महाराष्ट्रपाठोपाठ कर्नाटक, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन होते. या वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागात सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस झाल्याने कांद्याचं मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील 100 वर्षांमधील सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे कांद्याचे भाव वाढताना दिसून येत आहे. यामुळे साठेबाजीला देखील सुरुवात झाली असून यामुळे आणखी भाववाढ होऊ शकते.

म्हणून कांद्याच्या मागणीत वाढ

लॉकडाउनच्या काळात हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टोरंट बंद असल्याने कांद्याचे भाव स्थिर होते. त्यानंतर हळूहळू सर्व सुरू झाल्याने कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे अचानक कांद्याच्या भावामध्ये वाढ झाली. त्यानंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या किमतीने आभाळ गाठलं.

किती वाढू शकतो भाव

सध्या बाजारात कांद्याचा भाव हा 70 ते 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतो. नवीन कांदा बाजारात येण्यास फेब्रुवारी महिना उजाडणार आहे. त्यामुळे सध्या 7100 रुपये क्विंटल भाव आहे. परंतु देशभरात विविध बाजारांत जाताना यामध्ये किलोमागे 30 ते 40 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊ शकतो.

देशभरातील विविध राज्यांमध्ये कांद्याची स्थिती

महाराष्ट्र

महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे ,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व भागात कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या लालसलगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याचा भाव हा 7100 रुपये क्विंटलवर गेला होता. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये कांद्याचा भाव 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कांद्याचे उत्पादन होणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या भावामध्ये वाढ झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

केरळ

सध्या केरळमध्ये कांदा 75 ते 90 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी हाच कांदा 20 ते 25 रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. त्याचबरोबर Shallots म्हणून विकला जाणारा छोटा कांदा देखील काही दिवसांपूर्वी 70-85 रुपये प्रतिकिलो होता. पण आता तो 100 रुपये किलोने विकला जात आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा

सध्या या दोन राज्यांमध्ये होलसेल बाजारांत कांद्याचा भाव 70 ते 85 रुपये असून रिटेलमध्ये हाच भाव 100 रुपयांपर्यंत आहे. पावसामुळे कांदयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं व्यापाऱ्यांनी साठवलेल्या कांद्याच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. अवकाळी पावसामुळे आंध्र प्रदेशमध्ये 15 हजार एकर आणि तेलंगणामध्ये साडेपाच हजार एकरांवरील कांद्याचं नुकसान झालं आहे. या वाढलेल्या भावामुळे आंध्र प्रदेश सरकार Raitu Bazars च्या माध्यमातून 1 हजार टन कांदा विकण्याची तयारी करत आहे.

तामिळनाडू

तामिळनाडू सरकार अम्मा फार्म फ्रेशच्या माध्यमातून कांद्याच्या भावावर नजर ठेवून आहे. बाजारात कांद्याचा भाव सध्या 100 रुपये प्रतिकिलो असून अम्मा फार्म फ्रेशच्या माध्यमातून 45 रुपये किलो कांदा विकण्याचे काम सरकार करत आहे. कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्या म्हणून इराण आणि ग्रीस सरकारकडून कांदा मागवत आहे.

कर्नाटक

महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन होते. परंतु अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून उत्तर कर्नाटकमध्ये सर्वात जास्त फटका बसला आहे. बागलकोट जिल्ह्यात 90 हजार हेक्टरवरील कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं आहे. कर्नाटकमध्ये 2 लाख हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात सध्या कांद्याचा भाव हा 80 ते 100 रुपये प्रतिकलोपर्यंत वाढला आहे.

बिहार आणि झारखंड

मध्य प्रदेशमध्ये कांद्याचा भाव 5500-6000 क्विंटल आहे. बिहार आणि झारखंड या राज्याला लागून असल्याने या ठिकाणी कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये किलो आहे. पण येणाऱ्या दिवसांमध्ये यामध्ये वाढ देखील होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीत कांद्याचा मुद्दा जोर पकडू शकतो. मागील निवडणुकीवेळी जेलच्या बाहेर असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी डाळी आणि कांद्याच्या वाढत्या किमतींचा मुद्दा निवडणुकीमध्ये लावून धरला होता.

देशातील अन्य भागांतील स्थिती

आसाममध्ये कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये किलो आहे. तसंच ओरिसामध्ये काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव 30-35 रुपये किलो होता. तो सध्या 70 ते 75 रुपये आहे. याविषयी ओडिशा ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारामध्ये कांद्याचा भाव 6500 रुपये प्रतिक्विंटल आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 22, 2020, 5:03 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या