हरिद्वार, 09 जून : फक्त 15 दिवसांमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष (Double money fraud case) दाखवत तब्बल 250 कोटी रुपयांची फसवणूक केेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक केवळ 4 महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोएडा (Noida) येथून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. एसटीएफने नोएडा येथून एका आरोपीला 250 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. चीनच्या स्टार्टअप योजनेंतर्गत बनविलेल्या अॅपद्वारे ही फसवणूक केली गेली. हे अॅप देशातील सुमारे 50 लाख लोकांनी डाउनलोड केले आहे. या अॅपद्वारे लोकांना 15 दिवसांत त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविले जात होते.
या फसवणुकीत लोकांना अगोदर पॉवर बँक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांना 15 दिवसात गुंतवलेले पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवले जायचे. याप्रकारे एका व्यक्तीने एकदा 93 हजार आणि दुसऱ्यांदा 72 हजार रुपये जमा केले होते. हे पैसे त्यांना 15 दिवसांमध्ये दुप्पट होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उत्तराखंडच्या हरिद्वारमधील एकाने तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलीस आता याचा सखोल तपास करत आहेत.
लोकांनी अॅपद्वारे जमा केलेले पैसे वेगवेगळ्या खात्यात वर्ग झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. धक्कादायक म्हणजे सर्व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास केला असता तब्बल 250 कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतातील व्यवसायिकांना कमिशन देण्याचे आमिष दाखवून या ॲपद्वारे लोकांना सुरुवातीला कर्ज देण्यात येत होते. त्यानंतर यामध्ये बदल करून लोकांनी गुंतवलेले पैसे पंधरा दिवसात दुप्पट देण्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला एकाच खात्यात हे पैसे गुंतवले जात होते. त्यावेळी काही लोकांना पैसे परतही मिळाले, असे उत्तराखंड सायबर क्राईम विभागाचे पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितलं.
आरोपीकडून 19 लॅपटॉप, 592 सिम कार्ड जप्त
अजय सिंह म्हणाले की, तपासणीनंतर उत्तराखंड एसटीएफने या प्रकरणातील आरोपी पवन पांडे याला नोएडा येथून अटक केली आहे. आरोपीकडून 19 लॅपटॉप, 592 सिम कार्ड, 5 मोबाइल फोन, 4 एटीएम कार्ड आणि 1 पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. एसटीएफला तपासणीत असे आढळले की, हे पैसे क्रिप्टो चलनात रूपांतर करून परदेशात पाठविले जात आहेत.
डेहराडूनचे एडीजी अभिनव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनच्या स्टार्ट अप योजनेत अशी अॅप बनविण्यात आली आहेत. या प्रकरणाविषयी इतर तपास यंत्रणा आयबी आणि रॉ यांनाही कळविण्यात आले आहे. परदेशी लोक ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांची माहिती घेतली जात आहे. लवकरच माहिती बाहेर येईल. आतापर्यंत उत्तराखंडमध्ये दोन आणि बंगळुरूमध्ये एकाने याबाबत तक्रारींची नोंद केली आहे.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.