देहराडून, 16 फेब्रुवारी : पुलवामामध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं देहराडूनमधील खासगी काॅलेजनं एका काश्मिरी विद्यार्थ्यांचं निलंबन केलं आहे. तर, एकाला समन्स पाठवण्यात आलं आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्यानंतर 'आज तो रिअल पबजी हो गया' अशी कमेंट पहिल्या वर्षात शिकणाऱ्या काश्मिरी तरूणानं केली होती.
त्यानंतर संबंधित पोस्टचा स्क्रिन शॉट काढून तो व्हॉट्सअॅपवरील ग्रुपवरती शेअर करण्यात आला. तो फोटो खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर कॉलेजसमोर निदर्शनं करत विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत कॉलेजनं विद्यार्थ्याचं निलंबन केलं आहे. तर, आक्षेपार्ह कमेंट प्रकरणी आणखी एका काश्मिरी विद्यार्थ्याला कॉलेजनं समन्स बजावलं असून सुट्टी संपल्यानंतर आपली बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यातील एक विद्यार्थी रेडिओलॉजिस्टचं शिक्षण घेत आहे. तर, एका इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
सध्या कॉलेजबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
काश्मीरी विद्यार्थ्याचे वादग्रस्त ट्विट
पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यानेही वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील बीएस्सीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ टि्वट केलं होतं. बसीम हिलाल असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या संघटनेचं समर्थन करणारे ट्विट केल्यानं त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं आहे.
बसीम हिलालने केलेल्या ट्विटमध्ये उरी चित्रपटातील 'How's the Josh' या डायलॉगचा वापर करताना जोश ऐवजी जैश असं लिहिलं होतं. त्यानंतर त्याने ग्रेट सर असं लिहून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं समर्थन केलं आहे. त्याचं ट्विटर हँडल सध्या सस्पेंड करण्यात आलं आहे.
बसीम हिलाल याने केलेलं ट्विट व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहे. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी हिलालविरुद्ध आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
========================