श्रीनगर, 6 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधील सोपोर सेक्टर येथे वारपोरा परिसरात शनिवारी (6 एप्रिल)संध्याकाळी दहशतवाद्यांनी एका जवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घरात घुसून जवानावर गोळीबार केला. मोहम्मद रफी असं हत्या करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. रफी काही दिवसांपूर्वीच सुट्टी घेऊन घरी आले होते. तर दुसरीकडे, जम्मू काश्मीरमधील शोपियाँ सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शोपियाँ जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण एम.टेकचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहिल राशिद शेख असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. तो नूनर गांदरबल परिसरातील राहणारा होता. धक्कादायक बाब म्हणजे राहिलनं 3 एप्रिल (2019) रोजीच हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.तर दुसरा दहशतवाद्याचं नाव बिलाल अहमद असं असून तो शोपियाँ जिल्ह्यातील किगाम येथील राहणारा होता.