मुंबई, 5 जून : ओडिशामध्ये 2 जूनला शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट आणि एका मालगाडीचा अपघात झाला. बालासोरमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला आणि 900 पेक्षा जास्त जण जखमी झाले. या अपघातग्रस्तांसाठी रिलायन्स फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून अपघातग्रस्तांना 10 प्रकारे मदत केली जाणार आहे.
'रिलायन्स फाऊंडेशनकडून ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली, मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत. अपघाताबद्दल माहिती मिळताच आमची स्पेशल डिजास्टर मॅनजमेंट टीम लगेचच अपघाताच्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेली. तसंच आमच्या टीमकडून दुखापतग्रस्तांना मदत आणि साहाय्य केलं जात आहे,' असं रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी सांगितलं आहे.
'या अपघातामुळे झालेलं नुकसान आपण भरून काढू शकत नाही, पण अपघातग्रस्तांचं कुटुंब पुन्हा उभं करण्यात आपण नक्कीच मदत करू शकतो. त्यामुळे आम्ही 10 प्रकारे अपघातग्रस्तांना मदत करत आहोत. या कठीण काळामध्ये आमचं फाऊंडेशन आणि रिलायन्स कुटुंब अपघातग्रस्तांसोबत भक्कमपणे उभं आहे,' असं नीता अंबानी म्हणाल्या आहेत.
रिलायन्स फाऊंडेशनकडून 10 प्रकारे मदत
1 जिओ-बीपी नेटवर्कच्या माध्यमातून अपघाताच्या ठिकाणी असलेल्या ऍम्ब्युलन्सना मोफत इंधनाची सोय
2 अपघातग्रस्त कुटुंबाला पुढचे सहा महिने रिलायन्स स्टोरच्या माध्यमातून रेशन दिलं जाईल, ज्यामध्ये पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ आणि स्वयंपाकाचं तेल दिलं जाईल.
3 दुखापतग्रस्त लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना मोफत औषधं दिली जातील. अपघातानंतर ज्यांना उपाचारांची गरज आहे त्यांच्यासाठी रुग्णालयाची सोय केली जाईल.
4 भावनिक आणि मानसिक आधारासाठी समुपदेशनही दिलं जाईल.
5 मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून नोकरीची संधी दिली जाईल.
6 अपघातामध्ये दिव्यांग झालेल्यांना व्हीलचेअर, कृत्रिम हात-पाय लावण्यासाठी मदत केली जाईल.
7 नवीन रोजगार संधी शोधत असलेल्या आणि अपघाताने प्रभावित झालेल्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल
8 अपघातामध्ये कुटुंबातील कमावता गमावला असेल तर अशा महिलांना मायक्रोफायनान्स आणि प्रशिक्षणाची संधी दिली जाईल.
9 ग्रामिण भागातल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्यांच्या माध्यमातून उपजीविकेसाठी पर्यायी आधार दिला जाणार.
10 अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील एकाला पुढील वर्षभर मोफत मोबाईल सेवा दिली जाणार.
रिलायन्स फाऊंडेशनची स्पेशल डिजास्टर मॅनेजमेंट टीम अपघात झाल्यापासून बालासोरमध्ये आहे. ही टीम आणिबाणी विभाग, बालासोरचे जिल्हाधिकारी, नॅशनल डिजास्टर रिसपॉन्स फोर्स यांच्याशी सहकार्य करत आहे. ही टीम रेल्वे डब्यांमध्ये अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढून अपघातात जमखी झालेल्यांना ऍम्ब्युलन्समध्ये नेत आहे. अपघातग्रस्तांना ताबडतोब मास्क, ग्लोव्हज, ओआरएस, बेडशीट आणि इतर गरजेच्या वस्तू दिल्या जात आहेत. रिलायन्स फाऊंडेशनचे स्वयंसेवक गॅस कटरचा वापर करत ट्रेनच्या डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.
मदतकार्यामध्ये कुठेही खंड पडू नये म्हणून रिलायन्स फाऊंडेशनने स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेतली आहे, यातून मदतकार्य करणाऱ्या आणि अपघातग्रस्त असा एकूण 1200 जणांच्या जेवणाची सोय केली जात आहे. तसंच अपघाताच्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयही केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.