भुवनेश्वर, 2 मे : फानी चक्रीवादळ येत्या दोन दिवसात रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. ओडिशातील दक्षिण पुरीच्या गोपालपूर आणि चांदबली भागात फानी वादळ धडकेल, असा अंदाज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए)व्यक्त केला आहे. फानी चक्रीवादळ शुक्रवारी (3 मे) दुपारी पुरी जिल्ह्यातील चंद्रभागापासून 10 किलोमीटर अंतरावरील भागात धडकेल, अशी शक्यता आहे. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील कमीत कमी 19 जिल्ह्यांना फटका बसू शकतो. वादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी 185 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. हे वादळ जगतसिंहपूर, केंद्रपारा, भद्रक आणि बालासोर मार्गे पश्चिम बंगालमध्ये धडकणार आहे.
फानी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सरकारने पर्यटकांना पुरी सोडून जाण्यास सांगितले आहे. किनारपट्टी भागात मासेमारी थांबवण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
Bhubaneswar: Preparations underway by Odisha Fire Services in view of "extremely severe" cyclonic storm #Fani. Around 50 teams of six members each are on alert in the city. #Odisha (01.05.19) pic.twitter.com/RCr4OOFwt5
हवामान विभागानं या वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. हवामान खात्याचा इशारा गंभीरतेने घेत भारतीय रेल्वेनं तब्बल 74 ट्रेन रद्द केल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षा लक्ष घेत संबंधित रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ओडिशाच्या भदरकपासून ते विजियानगरमदरम्यानची रेल्वे सेवा 2 मे रोजी बंद करण्यात येणार असल्याची सांगण्यात येत आहे. यापुढे काही दिवस रेल्वेच्या वेळेनुसार प्रवासाचं नियोजन करा, असा सल्ला ईस्ट कोस्ट रेल्वेनं प्रवाशांना दिला आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर आणि पुरीकडे जाणाऱ्या गाड्या देखील 2 मेच्या संध्याकाळपासून रद्द करण्यात येणार आहेत.
या रेल्वेदेखील होणार रद्द
रेल्वे सेवा रद्द करण्याच्या निर्णयानंतर ईस्ट कोस्ट एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस 2 मेपासून हावडा इथून धावणार नाहीत. तर पुरीपासून हावडापर्यंत जाणाऱ्या गाड्या 2 मे रोजी रात्री रद्द करण्यात येणार आहेत.
हावडा इथून, बंगळुरू, चेन्नई आणि सिंकदराबादपर्यंत जाणाऱ्या गाड्यादेखील 2 तारखेला रद्द करण्यात येणार आहेत. भुवनेश्वर आणि पुरी इथून धावणाऱ्या सर्व गाड्या 3 तारखेपासून रद्द करण्यात येणार आहे.