भुवनेश्वर, 29 जानेवारी : ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान त्यांच्या छातीत गोळी लागली होती. अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोळी लागून जखमी झालेले ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा किशोर दास यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेनंतर देशात खळबळ उडाली असून राज्याने मोठा नेता गमावल्याचे बोलले जात आहे.
झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर शहरात दुपारी एकच्या सुमारास दास एका सभेसाठी जात असताना ही घटना घडली. सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) गोपाल दास यांनी मंत्र्यांवर गोळीबार केला. यावेळी मंत्री गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती पाहता त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा निषेध करताना मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माननीय मंत्री नबा दास यांच्यावर झालेल्या या दुर्दैवी हल्ल्याने मला धक्का बसला आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाचा - मोठी बातमी! ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांचे निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
एसडीपीओच्या म्हणण्यानुसार, मंत्री यांना प्रथम झारसुगुडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, नंतर त्यांना "चांगल्या उपचारांसाठी" भुवनेश्वरमधील अपोलो रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले. पोलीस उपायुक्त प्रतीक सिंह यांनी सांगितले की, भुवनेश्वरमधील मंत्र्यांना रुग्णालयात नेण्यासाठी विमानतळ ते रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. त्यांनी सांगितले, “मंत्र्यांना सुखरूप आणण्यासाठी संपूर्ण कॉरिडॉरमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
त्याचवेळी या घटनेनंतर ब्रजराजनगरमध्ये तणाव निर्माण झाला असून बिजू जनता दल (बीजेडी) मंत्र्याचे समर्थक 'सुरक्षेतील त्रुटी'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मंत्र्यांना टार्गेट करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा काहींनी केला आहे. एसडीपीओने सांगितले की, आरोपी एएसआयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Odisha